Mumbai Monorail: गेल्या काही वर्षांमध्ये तांत्रिक बिघाड आणि अन्य गोष्टींमुळे सातत्याने चर्चेत असणारी चेंबूर ते जेकब सर्कलदरम्यान सुरु असलेली मोनोरेल सेवा आता बंद होणार आहे. येत्या शनिवारपासून म्हणजे 20 सप्टेंबरपासून मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद होणार आहे. 2014 साली मुंबईकरांसाठी मोनोरेल सेवा सुरु करण्यात आली होती. मात्र, मोनोरेल सेवेला प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे मोनोरेल तोट्यात चालत होती. यानंतर अलीकडच्या काळात मोनोरेलमध्ये अनेकदा तांत्रिक समस्या उद्भवल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला होता. काही दिवसांपूर्वीच भरपावसात मोनोरेल दोन स्थानकांच्यामध्ये बंद पडली होती. त्यामुळे अग्निशमन दलाला शिड्या लावून गाडीतील 588 प्रवाशांना खाली उतरवण्याची वेळ आली होती. या सगळ्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता.
यानंतर आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) मोनोरेलची सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कदाचित हा अवधी दोन महिन्यांचा असू शकतो. या काळात मोनोरेलच्या सेवेत आमुलाग्र बदल करण्याची एमएमआरडीएची योजना आहे. आगामी काळात मोनोरेल सेवेत अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येईल आणि त्यानंतर ती पुन्हा प्रवाशांच्या सेवेत रुजू केली जाईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
मोनोरेल सेवेच्या मार्गिकेतील पहिला टप्पा 2014 साली सुरु झाला होता. तर दुसरा टप्पा 2019 पासून सुरु झाला. मात्र, या सेवेला मुंबईकरांचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. भलत्याच ठिकाणी असलेली स्थानकं, गाड्यांची कमी संख्या आणि कमी फेऱ्या या सगळ्यामुळे मोनोरेलची सेवा दिवसेंदिवस कुप्रसिद्ध होत गेली. 2014 ते 2022 या आठ वर्षांमध्ये एमएमआरडीएला मोनोरेल चालवून 29.73 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. मात्र, ही सेवा चालवण्यासाठी 343 कोटी रुपयांचा खर्च झाला. याशिवाय, सध्या सेवेत असलेल्या मोनोरेल गाड्या जुन्या झाल्या आहेत. या गाड्या परदेशी बनावटीच्या असल्याने त्यांची दुरुस्ती अवघड होऊन बसली आहे.
Monorail news: मोनोरेल सेवेचा कायापालट होणार?
मोनोरेल सेवा आता पुढील काही महिन्यांसाठी बंद असेल. या काळात मोनोरेलची सेवा, तंत्रज्ञान या सगळ्यात आमुलाग्र बदल केले जाण्याची शक्यता आहे. सध्याच्या मोनोरेल गाड्या या परदेशी बनावटीच्या आहेत. मात्र, आता मेक इन इंडिया प्रकल्पातंर्गत मोनोरेलचे डबे देशातच तयार केले जातील. तसेच हैदराबाद येथे विकसित करण्यात आलेली सीबीटीसी ही नवीन सिग्नल यंत्रणाही मोनोरेलवर कार्यान्वित केली जाऊ शकते. त्यासाठी काही काळ मोनोरेल सेवा बंद ठेवावी लागेल. यानंतर मोनोरेल सक्षम आणि सुरक्षित करुन पूर्ववत केली जाईल.
आणखी वाचा
582 लोकांनी खचाखच भरलेली मोनोरेल अचानक बंद का पडली? समोर आलं महत्त्वाचं कारण