मुंबई : मुंबईत एकीकडे मुसळधार पाऊस पडत असताना दुसरीकडे मोनोरेलसंबधी जीवघेणी घटना घडली चेंबूर ते भक्ती पार्क धावत असताना मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि मोनोरेल जागीच थांबली. सुमारे सव्वा तासांनंतर या मोनोरेलमधून प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं. या दरम्यान, अनेकांचा जीव गुदमरला, अनेकांचा जीव टांगणीला लागला. त्यामध्ये भीतीने गांगलेल्या प्रवाशांनी हात जोडल्याचे दिसून आले तर एका प्रवाशाने काच फोडून मोकळा श्वास घेण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं.
चेंबूर ते भक्ती पार्क अशा धावणाऱ्या मोनोरेलमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला आणि ही ट्रेन जागीच थांबली. मोनोरेल एसी असल्याने दरवाजे बंद होते. मोनोरेल बंद झाल्यानंतर आधी आतील एसी बंद पडला. त्यामुळे आतील प्रवाशांना गुदमरल्याचा त्रास सुरू झाला.
व्हेंटिलेशन सिंस्टिम बंद पडल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. त्यातच हळूहळू आतील लाईटही बंद पडली आणि अंधार झाला. त्यामुळे या प्रवाशांमध्ये अधिकच भीतीचं वातावरण निर्माण झालं.
प्रवाशांनी हात जोडले
सुमारे एक ते दीड तासांपासून हे प्रवासी आतमध्ये होते. त्यांच्या सुटकेसाठी मुंबई महापालिकेचे बचाव पथक हजर होतं. त्यातच ही मोनोरेल एका बाजूला कललेल्याने प्रवाशांमध्ये अधिकच भीतीचं वातावरण निर्माण झालं. त्यातील काही प्रवाशांनी हात जोडल्याचं आणि आपल्याला वाचवण्याची विनंती केल्याचं दिसून आलं.
प्रवाशाने काच फोडली
सुरुवातीला काच फोडून आतील प्रवाशांना बाहेर काढण्याचं नियोजन सुरू होतं. पण आत असलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. त्यामुळे आतील प्रवाशांनी काचेवर हात मारण्यास सुरूवात केली. एका प्रवाशाने काच फोडली आणि त्यामुळे बाहेरची हवा आत गेल्याने प्रवाशांनी काहीसा सुटकेचा निश्वास टाकला.
प्रवाशांना बाहेर काढलं
दरम्यान, कुणीही काचेच्या जवळ थांबू नये असं आवाहन बचाव पथकाकडून करण्यात येत होते. तांत्रिक बिघाडामुळे बंद पडलेल्या मोनो रेल्वेतून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुंबई अग्निशमन दलाने मदत कार्य सुरु केले. बचाव पथकाने दोन ठिकाणच्या काचा फोडल्या आणि सर्व प्रवाशांना बाहेर काढलं. त्याचवेळी महानगरपालिकेचे वैद्यकीय पथक तयार ठेवण्यात आलं होतं. तसेच नजीकच्या महानगरपालिका रुग्णालयास सुसज्ज राहण्याचे आदेशही देण्यात आले होते.
ही बातमी वाचा: