मुंबई : सलग तीन दिवस पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाल्याचं दिसून आलं. मंगळवारी सकाळपासूनच रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्याचं दिसून आलं. त्याचा परिणाम लोकस सेवांवरही झाला. सेट्रंल लाईनवरील सीएसटीकडे येणाऱ्या लोकल या ठाण्यापर्यंतच धावत होत्या. ठाणे ते सीएसटी अशी लोकल सेवा रद्द करण्यात आली. तर वेस्टर्न मार्गावरही लोकल सेवा धिम्या गतीने सुरू होत्या.
मुंबईतील अंधेरी, कुर्ला, सायन, हिंदमाता या परिसरात पाणी साचल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाल्याचं दिसून आलं. मुंबईत पुढील तीन तासांसाठी रेड अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग 46-60 किलोमीटर इतका असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली
मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मिठी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. मिठी नदीने धोकादायक पातळी गाठली. त्यामुळे मिठी नदी परिसरात एनडीआरएफची टीम दाखल झाली.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडूनही मिठी नदी परिसरात पाहणी करण्यात आली. मिठी नदीने धोक्याची पातळी गाठल्याचं बघता नदी लगत राहणाऱ्या रहिवाशांना स्थलांतर करण्याचं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं. पालिकेनेही कुर्ला परिसरातील सखल भागातील सुमारे 350 नागरिकांचे स्थलांतर केलं. या ठिकाणी सदर नागरिकांच्या खानपानाची व्यवस्था बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे.
हिंदमाता परिसरात पाणी साचलं, वाहतूक बंद
मुंबईत सुरू असलेल्या पावसाने हिंदमाता परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील वाहतूकही बंद करण्यात आली आहे. हिंदमाता परिसरात साचलेले पाणी काढण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
कुर्ल्यात रस्त्यावर पाणीच पाणी
मुंबईतील कुर्ल्यातील एलबीएस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. रस्त्याला नदीचे स्वरुप आल्याचं चित्र आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने पाणी साचल्याने वाहतूकही बंद झाली आहे. मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गाला लगत असलेल्या कलिना जंक्शनमध्ये पाणी साचलं आहे. त्यामुळे अनेक गाड्या साचलेल्या पाण्यात अडकून बंद पडल्या.
समुद्राला उधाण
मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहे. मुंबईच्या समुद्र किनारपट्टीवरही जोरदार पाऊस सुरू आहे. वाऱ्याचा वेगही वाढल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईच्या समुद्रात उधाणाच्या भरतीची वेळ रात्री 8.53 ची आहे आणि त्यावेळी समुद्रात 3.14 मीटरपर्यंत लाटा उसळण्याची शक्यता आहे.
वसई ते डहाणू सर्व लोकल सेवा ठप्प, ट्रॅकवर पाणीच पाणी
वसई नालासोपारा स्टेशन दरम्यान ट्रॅकवर पाणी साचल्याने वसई ते डहाणूपर्यंतच्या सर्व लोकल सेवा ठप्प झाल्या आहेत. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने वसई ते नालासोपारा ट्रक वरून प्रवाशी चालत जात आहेत.
ही बातमी वाचा: