Mono Rail VIDEO: पावसामुळे मोनोरेलचा खोळंबा! चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान मोनोरेल बंद पडली, काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढणार
Mumbai Mono Rail : मोनो रेल्वेतून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुंबई अग्निशमन दलाने मदत कार्य सुरु केले आहे. आतमध्ये अडकलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

मुंबई : एकीकडे मुंबईत मुसळधार पाऊस पडत असताना, लोकल सेवा ठप्प असताना दुसरीकडे मोनोरेलचा खोळंबा झाल्याचं दिसून आलं. सायंकाळी 6.15 वाजेदरम्यान चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान मोनोरेल बंद पडली. प्रवाशांनी आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 1916 या क्रमांकावर संपर्क साधला. त्याची तातडीने दखल घेत मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तीन स्नोर्केल वाहनांच्या साहाय्याने मदत कार्य सुरु केले आहे.
चेंबूर ते भक्ती पार्क धावत असताना मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती अचानक बंद पडली. त्यामुळे आतील एसी बंद पडला. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ आणि भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसून येतंय.
रुग्णालयास सुसज्ज राहण्याचे निर्देश
तांत्रिक बिघाडामुळे बंद पडलेल्या मोनो रेल्वेतून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुंबई अग्निशमन दलाने मदत कार्य सुरु केले आहे. तसेच महानगरपालिकेचे वैद्यकीय पथक रवाना करण्यात आले आहे. नजीकच्या महानगरपालिका रुग्णालयास सुसज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढणार
गेल्या एका तासापासून ही मोनोरेल बंद असून आतील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या प्रवाशांच्या बचावासाठी तीन क्रेनच्या सहाय्याने मोहीम सुरू करण्यात आली आहे.
बचाव पथकाकडून प्रवाशांना इमर्जन्सी दरवाज्यापासून दूर राहण्याचं आवाहन केलं जात आहे. तो इमर्जन्सी दरवाजा तोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात येणार आहे.
एसी बंद असल्याने प्रवाशांना गुदमरल्याचा त्रास
मोनोरेल अचानक बंद पडल्याने आतील प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या मोनोरेलमध्ये व्हेंटिलेशनचा मुद्दा सर्वात मोठा आहे. एसी ट्रेन असल्याने ती बंदिस्त आहे आणि एसी बंद आहे. एका तासाहून अधिकचा काळ व्यतित झाला असल्याने त्यांना गुदमरल्याचा त्रास होत आहे. यातच गाडीतील लाईटही बंद होत आहे. या मोनोरेलमध्ये कोणीही टेक्निशियन नाही, फक्त ड्रायव्हर हाच एकमेव कर्मचारी असल्याची माहिती आहे. त्यामुळे ही ट्रेन बंद पडल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. या प्रकाराला जबाबदार कोण असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
शेवटची माहिती हाती येईपर्यंत सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे. सुमारे सव्वा तास हा थरार चालला होता.
ही बातमी वाचा:























