मुंबई : राज्यात शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीला तत्वत: मान्यता दिल्यानंतर सरकारकडून यासंदर्भात हालचाली वेगवान झाल्या आहेत. कर्जमाफीसाठी तपशील गोळा करण्यापासून ते अगदी यातल्या जाणकार व्यक्तींशी चर्चा करण्यापर्यंत, सर्व गोष्टी सरकारकडून केल्या जात आहेत. याचाच भाग म्हणून उच्चाधिकार मंत्रिगटातील प्रमुख आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना भेटले आणि दीड तास चर्चा केली.

शरद पवार यांना शेतीचा गाढा अभ्यास असून, केंद्रीय कृषीमंत्रिपदाची जबाबदारीही सांभाळली आहे. हेच लक्षात घेऊन चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना भेटून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात प्रदीर्घ चर्चा केली.

“शरद पवार यांचा कर्जमाफीवर चांगला अभ्यास आहे. 2008 साली जी कर्जमाफी झाली, त्याचं स्वरुप पवारांनीच डिझाईन केलं होतं. शेतकरी कर्जमाफीबाबत काय निकष असावेत आणि निर्णयाची अंमलबजावणी कशी असावी, याबाबत त्यांच्याशी चर्चा केली. पवारांशी अत्यंत सकारात्मक चर्चा झाली.”, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या या चर्चेदरम्यान अजित पवार आणि जयंत पाटील हेही उपस्थित होते.