मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक असलेल्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील 2030 घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आलेली आहे. म्हाडानं 2030 घरांपैकी 370 घरांच्या दरात 10 ते 12 लाख रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला. आता मुंबईतील या घरांसाठी नोंदणी करणाऱ्यांसाठी म्हाडा अजून एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या घरांसाठी नोंदणी आणि अर्ज भरण्याची अंतिम मुदत 4 सप्टेंबर निश्चित केली होती ती मुदत वाढवून 19 सप्टेंबर करण्यात आली आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2030 घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आलेली आहे. या घरांसाठी अर्ज करण्यास सुरुवात 9 ऑगस्टपासून करण्यात आलेली होती. तर, अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत 4 सप्टेंबर होती. तर, अनामत रक्कम जमा करण्यासाठी 9 सप्टेंबर ही तारीख निश्चित करण्यात आलेली होती. 13 सप्टेंबरला म्हाडाकडून सोडत काढण्यात येणार होती. मात्र, अर्ज दाखल करण्यास नागरिकांना केवळ 26 दिवसांचा कालावधी मिळाला होता. या दरम्यान अनेकांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. म्हाडाच्या लॉटरीला अपेक्षेप्रमाणं प्रतिसाद मिळाला नसल्याचं समोर आलं होतं. त्यामुळं म्हाडाकडून अर्ज नोंदणी करण्यास मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ 15 दिवसांची असेल.
सोडत लांबणीवर
म्हाडाच्या मुंबई मंडळानं घरांसाठी नोंदणी आणि अर्ज करण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ दिली गेल्यानं इच्छुकांना आता 19 सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करता येईल. मुदतवाढ दिलेल्या कालावधीत अर्ज आणि अनामत रक्कम सादर करावं लागेल. म्हाडाच्या सोडतीचा यापूर्वीचा दिनांक 13 सप्टेंबर होता, मात्र अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिल्यानं ती देखील लांबणीवर गेली असून त्याची नवीन तारीख लवकरच जाहीर होईल, अशी माहिती आहे.
म्हाडाची घरं मुंबईतील कोणत्या भागात?
मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड गृहनिर्माण प्रकल्पामध्ये विविध उत्पन्न गटातील 2030 घरं सोडतीसाठी उपलब्ध करण्यात आली होती. म्हाडानं या घरांपैकी 370 घरांच्या किमतीत 10 लाख ते 12 लाख रुपयांची कपात केली आहे.
दरम्यान, मुदतवाढ दिलेल्या काळात म्हाडाकडे अर्ज नोंदणी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. पहिल्यांदा म्हाडानं 26 दिवसांची मुदत दिली होती. त्यात अनेकांना कागदपत्रांची पूर्तता करणं अवघड झालं होतं. आता त्यांना कागदपत्र मिळवता येऊ शकतात. त्यामुळं म्हाडाकडे अर्ज सादर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होईल.
इतर बातम्या :
39 लाखाचे घर 29 लाखात, 62 लाखाचे घर 50 लाखात; म्हाडाकडून खुशखबर, 370 घरं 10 ते 12 लाखांनी स्वस्त