मुंबई : मुंबई मेट्रोची सेवा सकाळी काही काळ विस्कळीत झाली होती. साकीनाका मेट्रो स्थानकावर एका तरुणाने ट्रेनखाली आत्महत्या केल्यामुळे सेवा विस्कळीत झाली होती. तासभरापासून खोळंबलेल्या मेट्रोमुळे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी जमा झाली होती.
रविवारी सकाळी 9.20 मिनिटांनी उदय मिश्रा नामक 25 वर्षीय तरुणाने वर्सोवा-घाटकोपर मेट्रोखाली उडी मारुन आयुष्य संपवलं. त्यामुळे ही सेवा काही काळ विस्कळीत झाली. घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर घाटकोपरहून वर्सोव्याकडे जाणाऱ्या मेट्रो मरोळ नाका स्टेशनपर्यंतच चालवल्या जात होत्या. मात्र दीड तासाच्या खोळंब्यानंतर हळूहळू सेवा पूर्वपदावर आली.
सुट्टीचा दिवस असल्यामुळे ऑफिसला जाणाऱ्यांची गर्दी नसली, तरी सुट्टीनिमित्त बाहेर पडलेल्या प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. एकीकडे मध्य रेल्वेवर महामेगाब्लॉक असतानाच मेट्रोही रखडल्याने प्रवाशांचा संताप व्यक्त होत आहे.