मुंबई : मुंबईत मध्य रेल्वेवर आज 10 तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. सीएसटी-कल्याण मार्गावर नवीन फास्ट लाईनचं काम केलं जाणार असल्यामुळे मध्य मार्गावरील काही लोकलसह अनेक एक्स्प्रेसही रद्द करण्यात आल्या आहेत.
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिवा स्थानकात लोकल लाईनच्या कट-कनेक्शन कामांसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे सीएसटी ते कल्याणपर्यंत नवीन जलद लाईन उपलब्ध होणार आहे. या ब्लॉकमुळे लोकल सेवांवर परिणाम होणार असल्यानं कोयना, सिंहगड, प्रगती, गोदावरी अशा 10 मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी इतर लोकल गाड्यांनी विशिष्ट ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत. यापुढच्या काही दिवसात दर पंधरा दिवसांनी असे मोठे ब्लॉक घेण्याचं रेल्वेनं नियोजन केलं आहे. आवश्यकता नसल्यास नागरिकांनी प्रवास टाळावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.