मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई मेट्रो रेल्वे प्रशासनाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांच्या पगारापेक्षा अधिक पगार मुंबई मेट्रोमधील सहा अधिकाऱ्यांना असल्याची माहिती समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारातून याबाबत माहिती मिळवली आहे.

 

या सहा अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त पगार!

 

मुंबई मेट्रोचे प्रोजेक्ट डायरेक्टर सुबोध गुप्ता, सिस्टीम डायरेक्टर अजय कुमार भट, कार्यकारी संचालक आर रामण्णा, सीएफओ इंद्रनिल सरकार, कार्यकारी संचालक (इलेक्ट्रिकल) आर. के. शर्मा, जनरल मॅनेजर (सिव्हिल) चारुहास जाधव या सहा अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई मेट्रो रेल्वे प्रशासनाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांच्यापेक्षाही अधिक पगार असल्याचं माहिती अधिकारातून समोर आलं आहे.

 

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई मेट्रोमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत आरटीआयद्वारे मार्च महिन्याच्या पगाराबाबत माहिती मागवली होती. मुंबई मेट्रोचे डेप्युटी अकाऊंटंट आणि पब्लिक इन्फर्मेशन ऑफिसर गणेश घुले यांनी अनिल गलगलींना 119 अधिकाऱ्यांच्या पगाराबाबत माहिती पुरवली. या माहितीनुसार, 6 अधिकाऱ्यांचे पगार हे मुख्यमंत्री आणि अश्विनी भिडेंपेक्षा अधिक असल्याचं दिसत आहे.

 

कुणाला किती पगार?

  • मुंबई मेट्रोचे प्रोजेक्ट डायरेक्टर सुबोध गुप्ता – रु. 2,08,706

  • सिस्टीम डायरेक्टर अजय कुमार भट - रु. 2,03,346

  • कार्यकारी संचालक आर रामण्णा - रु. 1,82,688

  • सीएफओ इंद्रनिल सरकार - रु. 1,51,936

  • कार्यकारी संचालक (इलेक्ट्रिकल) आर. के. शर्मा - रु. 1,92,945

  • जनरल मॅनेजर (सिव्हिल) चारुहास जाधव - रु. 1,51,936


 

मुख्यमंत्र्यांना किती पगार?

 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंना 57 हजार रुपये पगार, तर मुंबई मेट्रो रेल्वे प्रशासनाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांना 1 लाख 43 हजार 51 रुपये पगार आहे.