मुंबई : मुंबईतील मेट्रो कारशेड हे आरेतच होणार असून या ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनामागे काही छद्म पर्यावरणवादी आहेत असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. हा प्रकल्प दुसरीकडे नेणं म्हणजे नाकापेक्षा मोती जड असल्याचही ते म्हणाले. आरे कारशेडला विरोध करणाऱ्यांमध्ये जर खरे पर्यावरणवादी असतील तर त्यांची समजूत काढली जाईल असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सगळ्यांना माहिती आहे, आरेतील झाडं कापली आहेत, आता नवीन झाडं कापण्यात येणार नाहीत. असं असतानाही काही पर्यावरणवाद्यांकडून आंदोलन केलं जात आहे. त्यांना याची योग्य आणि पूर्ण माहिती नसावी. यामागे काही नकली पर्यावरणवादी कार्यरत आहेत. खर्या पर्यावरणवाद्यांची समजूत काढू. मुंबईला पर्यावरण पूरक आम्ही मेट्रो देत असून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल.


कारशेड प्रकल्प दुसरीकडे नेला तर नाकापेक्षा मोती जड असं होईल असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आरेतील 25 टक्के बांधकाम पूर्ण झालं आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकल्पाला मान्यता दिली आहे असं सांगत हा प्रकल्प आरेतच होईल असंही ते म्हणाले. 


गेल्या सरकारने घेतलेले सर्वच निर्णय रद्द करण्यात येणार नाही, जो निर्णय वादग्रस्त आहे, ज्याच्यावर वाद होईल असं वाटतंय, त्याचा अभ्यास करण्यात येईल. जे निर्णय सूडबुद्धीने घेण्यात आला आहे, तो रद्द करण्यात येईल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. उद्या बहुमताचा प्रस्ताव भक्कम मतांनी जिंकू असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.


पर्यावरणवाद्यांचा विरोध
मुंबईतील मेट्रो कारशेड आरेतच (Aarey Colony) बनवण्याचा निर्णय नवनिर्वाचित शिंदे सरकारनं घेतला आहे. या निर्णयाला पर्यावरणवाद्यांनी मोठा विरोध दर्शवला आहे. आज आरे जंगलातील मेट्रो कारशेडविरोधात पर्यावरणवाद्यांनी आज आंदोलनाची हाक दिली होती.


शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनीही आरेबाबतच्या निर्णयावर सरकारला पुन्हा एकदा विचार करण्याची विनंती केली आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे देखील आरे बचाव मोहमेसाठी मैदानात उतरले आहेत. 'आरे' कारशेडबाबत 'नव्या उपमुख्यमंत्र्यांनी पुनर्विचार करावा', अशी मागणी करणारी पोस्ट अमित ठाकरेंनी केली होती.


शिंदे सरकारनं आल्या आल्या 'आरे'मध्येच मेट्रो कार शेड होणार असल्याचं राज्याच्या अॅडव्होकेट जनरल यांना कळवलं आहे. आरेमध्येच मेट्रो कारशेड बांधण्यात येईल, असे निर्देश महाराष्ट्र सरकारने राज्याच्या महाधिवक्ता यांना दिले आहेत.   मेट्रो कारशेड हे आरेमधून कांजूरमार्गला नेण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला होता. यावरुन मोठा गदारोळ देखील झाला होता. आरेमधील मेट्रो शेड विरोधात नागरिक देखील मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे कारशेड कांजूरमार्गला नेण्याचा निर्णय घेतला होता.