Maharashtra Assembly Session :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारनं आज विधिमंडळ अधिवेशनात पहिल्या दिवशी पहिली लढाई जिंकली आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांची मोठ्या फरकानं निवड झाली. यामुळं उद्याच्या बहुमत चाचणीसाठी देखील शिंदे सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. आज पहिल्या दिवशीचं कामकाज विधानसभा अध्यक्ष निवड, त्यानंतर त्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावानंतर स्थगित करण्यात आलं. आता उद्या सरकारची दुसरी अग्निपरीक्षा असणार आहे. 


आज अधिवेशनात कामकाजाच्या शेवटी शोकप्रस्ताव मांडण्यात आलं. नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोकप्रस्ताव वाचून दाखवला. आजच्या दिवसाचं कामकाज संपलं आहे. आता उद्या सकाळी 11 वाजता विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार असून सरकारची मुख्य परीक्षा असणार आहे. राहुल नार्वेकर यांच्या विधानसभा अध्यक्षपदी निवडीनंतर सरकारने पहिली लढाई जिंकली आहे.
 
अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी जोरदार टोलेबाजी  
राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन करताना अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी जोरदार टोलेबाजी केली. मी जेव्हा समोरच्या बाजूला पाहतो तर मूळ भाजपवाले कमी दिसतात. आमच्याकडची लोकं जास्त दिसतात. मला मूळ भाजपवाल्यांचं वाईट वाटतं. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा करताच पिनड्रॉप सायलेन्स होता. भाजपची काही मंडळी रडायला लागली, असं अजित पवारांनी म्हटलं तर जयंत पाटील यांनी आमचे जावई असल्याने आम्हाला योग्य न्याय मिळेल अशी आशा आहे. नाही तर संध्याकाळी आमच्या घरी मुलीला काय केलं ते कळवू. मग संध्याकाळी आपला समाचार घेण्याची विनंती करु, असं म्हटल्यानंतर हशा पिकला 


त्यांनीही जावयाची काळजी घेणं अपेक्षित, नार्वेकरांचं उत्तर 
त्यावर शेवटी बोलताना मी जावई असल्याचं सांगत अजित पवार, जयंत पाटील यांनी काळजी घेण्यास सांगितलं. पण त्यांनीही जावयाची काळजी घेणं अपेक्षित आहे. त्यामुळे योग्य सहकार्य मिळेल यात शंका नाही असं राहुल नार्वेकर म्हणाले. गेल्या काही दिवसात अनेक धक्के, भूकंप आले. त्यातील एक धक्का मलाही मिळाला. माझी निवड झाली असं सांगत नार्वेकर यांनी पक्षाचे आभार मानले.
 
राहुल नार्वेकर यांनी मानले आभार
राहुल नार्वेकर यांनी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहित सर्वांचे आभार मानले. महत्वाची विधायके चर्चेविना पारित केले जाणार नाहीत असं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं. तसंच नियमांचं पालन केलं जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. याच सभागृहात चार माजी विधानसभा अध्यक्ष असल्याने हे माझं भाग्य असल्याचंही ते म्हणाले आहेत.