मुंबई : मेट्रो 3 च्या भुयारी मार्गाच्या कामाने जोर धरला आहे. मेट्रो तीन अंतर्गत येणाऱ्या सीएसएमटी ते मुंबई सेंट्रल दरम्यान रेल्वेकडून नुकतेच एका भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले. याबाबतचा व्हिडीओ मुंबई मेट्रो 3 ने ट्विट केला आहे.


टनेल बोरींग मशिन्सच्या (टीबीएम्स) सहाय्याने या भुयाराचं काम करण्यात आले. या भुयाराची लांबी एकूण 860 मीटर आहे.

याच प्रकल्पात आणखी एक बोगदा तयार करण्यात येणार आहे. भुयार सात हजार सहाशे चाळीस मीटर लांबीचे असणार आहेत. टीबीएमद्वारे मुंबई सेंट्रलपर्यंत या भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या मशिन्सला महाराष्ट्रातील सूर्या, वैतरणा, तानसा, कृष्णा, गोदावरी, तापी आणि वैनगंगा या नद्यांची नावे देण्यात आले आहेत.

मेट्रो-3 च्या विविध टप्प्यातील भुयारीकरण

आझाद मैदान - या पॅकेज-2 मधील वैतरणा 1 आणि 2 टीबीएम्सद्वारे ग्रँट रोडपर्यंत 4.5 किमी भुयारीकरण करण्यात येणार आहे. त्यापैकी 450 मीटर भुयारीकरण पूर्ण झालं आहे.
नयानगर - या पॅकेज-4 अंतर्गत कृष्णा 1 आणि 2 या टीबीएम्सद्वारे दादर मेट्रो स्थानकापर्यंत 2.5 किमी भुयारीकरण करण्यात येणार असून त्यापैकी 1005 मीटर भुयारीकरण पूर्ण झालं आहे.
विद्यानगरी - या पॅकेज 5 अंतर्गत गोदावरी 1 आणि 2 या मशिन्सद्वारे आंतरदेशीय विमानतळ स्थानकापर्यंत 2.98 किमी भुयारीकरण करण्यात येणार आहे. सध्या या पॅकेज अंतर्गत 342 मीटर भुयारीकरण पूर्ण झालं आहे.
मरोळ नाका - या पॅकेज 7 अंतर्गत 2 टीबीएमद्वारे आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचं 1.2 किमी भुयारीकरण करण्यात येणार आहे. या पॅकेजमध्ये सध्या वैनगंगा 1 आणि 2 या मशीनद्वारे 395 मीटर भुयारीकरण पूर्ण झालं आहे.

15 टीबीएम्सचे कारखाना स्वीकृती परिक्षण पूर्ण झालं असून प्रकल्पाला आवश्यक असणाऱ्या सर्वच्या सर्व म्हणजे सतरा टीबीएम्स जुलैअखेर दाखल होती. त्यानंतर पॅकेजमध्ये भुयारीकरणाला प्रारंभ होणं अपेक्षित आहे. यामुळे कामाला अधिक गती मिळणार आहे.