मुंबई : मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. वांद्रे-कुलाबा-सीप्झ या मेट्रो-3 चा प्रवास मेट्रो-1 पेक्षा स्वस्त असणार आहे. 2020 मध्ये जेव्हा मेट्रो-3 मुंबईकरांच्या सेवेत येईल तेव्हा एकेरी प्रवास भाडे जास्तीत जास्त 40 रुपये असणार आहे, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसीएल) ने दिली आहे.


मेट्रो-1, रिक्षा-टॅक्सी, ओला-उबर यांच्या तुलनेत मेट्रो-3 चे दर स्वस्त असतील. शिवाय बेस्टच्या तुलनेत हे दर केवळ 50 टक्के जास्त असतील, असा दावा एमएमआरसीने केला आहे.

एमएमआरसीएलने डीएमआरसीएलला (दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन) दरांचं जे स्ट्रक्चर दिलं आहे, त्यानुसार मेट्रो-3 च्या प्रवासात प्रति 3 किमीसाठी 2020 मध्ये केवळ 12 रुपये मोजावे लागतील, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

मेट्रो-3 च्या प्रवाशांना वांद्रे-कुलाबा-सीप्झ या 33 किमीच्या अंतरासाठी 2020 मध्ये केवळ 40 रुपये मोजावे लागतील. तर मेट्रो-1 च्या प्रवासासाठी वर्सोवा ते घाटकोपर हे 11 किमीचं अंतर कापण्यासाठी सध्या 40 रुपये मोजावे लागतात. म्हणजे मेट्रो-3 चं अंतर मेट्रो-1 च्या तुलनेत तीनपट जास्त आहे, तरीही केवळ 40 रुपये मोजावे लागणार आहेत.