मुंबई : मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांच्यातील कोल्ड वॉर चव्हाट्यावर आला आहे. आयुक्त आणि प्रशासन आपल्याला जुमानत नसल्याचा आरोप करत महापौरांनी आयुक्तांची कानउघडणी केली आहे.


मुंबईकरांसाठीचे निर्णय महापालिकेचे आयुक्त स्वत:च जाहीर करतात आणि माहिती परस्पर प्रसिद्धीमाध्यमांना देतात, असं महापौरांचं म्हणणं आहे. मुंबईचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांच्या अधिकारांवर गदा येत आहे, असं विश्वासनाथ महाडेश्वर यांनी म्हटलं आहे. संतापलेल्या महापौरांनी यासंदर्भात पत्र लिहून आयक्तांची कानउघडणी केली.

यापुढे पालिकेच्या योजना, प्रकल्प, धोरणात्मक निर्णयांची घोषणा महापौरच करतील, असे निर्देश विश्वनाथ महाडेश्वरांनी दिले आहेत. महापौरपदाला गृहीत धरुन परस्पर निर्णय घेऊ नयेत, असंही महाडेश्वरांनी म्हटल्याची माहिती आहे. नगर विकास विभागाचे आदेश पाळण्याच्या सूचनाही आयुक्तांना देण्यात आल्या आहेत.

पालिकेचे आयुक्त, उपायुक्त आणि रुग्णालयाच्या अधिष्ठातांसह अनेक खातेप्रमुख विविध योजना-प्रकल्प व धोरणात्मक निर्णयांची घोषणा महापौरांना विश्वासात न घेता परस्पर जाहीर करीत असल्यामुळे मुंबईचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांच्या अधिकारांवर गदा येत आहेत, असं महापौरांचं म्हणणं आहे.

विशेष म्हणजे याबाबत राज्य शासनाच्या नगर विकास खात्याने काढलेल्या परिपत्रकाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. याची गंभीर दखल घेत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आयुक्तांना आदेश देताना 'यापुढे पालिकेचे प्रकल्प-योजना आणि धोरणात्मक निर्णयांची प्रसिद्धी महापौरच देतील' असे निर्देश दिले आहेत.