मुंबई: पहिल्या पावसात मुंबईत कुठेही पाणी साचलं नाही, असा दावा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे. तसंच पावसाळ्यासाठी मुंबई सज्ज आहे, असाही आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.


एकीकडे महापौरांनी हा दावा केला असला, तरी पहिल्या पावसाने मुंबईतील रस्त्यांना आलेलं नदीचं रुप आणि रखडलेली वाहतूक हे सर्वांनी पाहिलं. त्यामुळे मुंबईचे महापौर गुडघाभर पाण्यात जाणाऱ्या वाहनांची दृश्यं खोटी ठरवू शकत नाहीत.

"मी काल मुंबईतल्या साकीनाका परिसरात फिरत होतो. कुठेही पाणीच साचलं नाही", असा दावा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला.

पावसाआधी आम्ही  साफसफाई केली असून पावसासाठी मुंबई सज्ज असल्याचंही महाडेश्वर यांनी म्हटलंय. त्याचबरोबर जे नाले एमएमआरडीए आणि रेल्वेच्या हद्दीत येतात ते अजूनही साफ झाले नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.

ज्या JVLR वर आज वाहनांच्या रांगा आणि रस्त्यावर साचलेलं पाणी दिसलं, तो भाग MMRDA च्या अखत्यारित येत असल्याचा दावा, महापौरांनी केला. तसंच मुंबई महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व भागाची नालेसफाई 95 टक्के पूर्ण झाल्याचंही महापौर महाडेश्वर म्हणाले.

पावसामुळे मुंबईत वाहतूक कोंडी, JVLR वर वाहनांच्या रांगा


मुंबईत रात्री दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे ऐन सकाळी वाहतुकीचा बोजवारा उडाला. ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे यांना जोडणाऱ्या जेव्हीएलआरवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली.

सकाळीच पावसाने हजेरी लावल्यामुळे हवेत आल्हाददायक गारवा निर्माण झाला, मात्र त्याच वेळी वाहतुकीचे तीनतेरा वाजले. मुंबईतील जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे सकाळी ऑफीसला जाणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. जेव्हीएलआरवर पाणी साचल्यामुळे वाहनं धीम्या गतीने जात होती.