मुंबई : मुंबईत रात्री दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे ऐन सकाळी वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे यांना जोडणाऱ्या जेव्हीएलआरवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली.

सकाळीच पावसाने हजेरी लावल्यामुळे हवेत आल्हाददायक गारवा निर्माण झाला, मात्र त्याच वेळी वाहतुकीचे तीनतेरा वाजले. मुंबईतील जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे सकाळी ऑफीसला जाणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. जेव्हीएलआरवर पाणी साचल्यामुळे वाहनं धीम्या गतीने जात होती.

मुंबईची लाईफलाईन असलेली पश्चिम आणि मध्य रेल्वे सुरळीत असल्यामुळे रेल्वे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला, तरी पावसामुळे अनेकांची त्रेधा उडाली.

मुंबई शहर, दक्षिण मुंबई, मध्य मुंबईसह उपनगरातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. दादर, प्रभादेवी, लालबाग, भायखळा भागात रात्री मुसळधार पाऊस झाला.

पश्चिम उपनगरांमध्येही विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, कांदिवली, मीरा रोड या भागांमध्येही पावसानं दमदार हजेरी लावली. नवी मुंबईतही पावसाचा जोर कायम होता.

मान्सूननं तळकोकणात वर्दी दिली आहे. सिंधुदुर्गच्या सीमेवरच्या भागात कालपासून जोरदार पाऊस सुरु झाला आहे. सिंधुदुर्गच्या वेंगुर्लामध्ये हजेरी लावल्यानंतर राज्यात मान्सूनचा प्रवास सुरु झाल्याची माहिती पुणे वेधशाळेनं दिली. आता पुढच्या 72 तासात मान्सूनचं कोकणच्या दिशेनं पुनरागमन होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.