मुंबई : आर्थिक विवंचनेमुळे 10 महिन्यांपूर्वी आत्महत्या केलेल्या तरुणाचा मृतदेह त्याचे डीएनए सॅम्पल्स घेण्यासाठी उकरुन काढण्यात आला आहे. तरुणाच्या पत्नीला व्यभिचारी ठरवण्यासाठी कुटुंबीयांनी हे पाऊल उचलल्याचा आरोप होत आहे.


 
डेक्कन क्रॉनिकल्सच्या वृत्तानुसार हॉटेल मॅनेजमेंट केलेल्या 37 वर्षीय मेल्विन फर्नांडिसने 10 महिन्यांपूर्वी म्हणजे ऑगस्ट 2015 मध्ये यूएसएमध्ये आत्महत्या केली होती. त्याच्या पत्नीने 10 दिवसांपूर्वी एका बाळाला जन्म दिला.

 
मेल्विन या बाळाचा सख्खा पिता नसल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. याची खात्री पटवण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येत आहे. वरळी पोलिस आणि नायर रुग्णालयातील फॉरेन्सिक तज्ज्ञांनी मेल्विनच्या पार्थिवाचं उत्खनन केलं आहे.

 
मेल्विनचे पिता हे निवृत्त चालक असून त्यांनी 2005 मध्ये मेल्विनला यूएसला पाठवण्यासाठी साडेतीन लाख रुपये जमा केले होते.

 
गेल्या वर्षी मेल्विनचा मृतदेह मायदेशी परत आणण्यासाठी कुटुंबीयांकडे पुरेसं आर्थिक बळ नव्हतं. त्यावेळी जगभरातल्या 400 जणांकडून मदत घेऊन 20 लाख रुपये जमा करण्यात आले. त्यानंतर अचानक मेल्विनच्या कुटुंबीयांनी त्याच्या मृत्यूचं कारण जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केल्याचं वरळी पोलिसांनी सांगितलं. मेल्विनचं पोस्टमार्टम न झाल्यामुळे कुटुंबीयांना हिरवा कंदिल दाखवला.

 
त्याचवेळी मेल्विनच्या पत्नीने जन्म दिलेला मुलगा, हा मेल्विनचाच आहे की नाही, हे जाणण्यासाठी डीएनए टेस्ट करण्याचा अर्ज केला.