मुंबई: मुंबई पोलिसांनी मुंबई विद्यापीठातील इंजिनिअरिंग पेपर स्कॅमचा पर्दाफाश केला आहे. मुलांना पेपर सोडवण्यासाठी मदत करणाऱ्या 4 कारकून, 3 शिपाई आणि एका अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.
बऱ्याच वेळेला विद्यार्थी इंजिनिअरिंगचे पेपर उत्तर येत नसल्याने कोरे सोडून देतात. अटक केलेले आरोपी विद्यापीठातले पेपर आपल्या घरी घेऊन जायचे आणि काही पैशांच्या मोबादल्यात कोऱ्या पेपरवर उत्तर लिहून विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी मदत करायचे.
पण अखेर या प्रकरणाची कुणकुण लागताच मुंबई पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
92 उत्तरपत्रिका जप्त
या रॅकेटचा पर्दाफाश केल्यामुळे विद्यापीठ आणि शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे. आरोपींकडून 92 उत्तरपत्रिका जप्त करण्यात आल्या आहेत.
मुंबई विद्यापीठात काही विद्यार्थी उत्तरपत्रिका बाहेर आणून सोडवत असल्याची माहिती माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली. पोलिसांनी आधी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांवर डोळा ठेवून त्यांना अटक केली आणिर याप्रकाराचा भांडाफोड झाला.
कर्मचाऱ्यांची टोळी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन हे रॅकेट चालवत असल्याचं उघड झालं.
कोरा पेपर पुन्हा सोडवण्याचा फंडा
शिपाई आणि कर्मचारी परीक्षेवेळी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकडून पैसे घ्यायचे. त्यानंतर विद्यार्थी पेपरला केवळ हजेरी लावून, उत्तरपत्रिका कोरी सोडून जायचे. त्यावेळी पैसे घेतलेले कर्मचारी विद्यार्थ्यांकडून हॉलतिकीट घ्यायचे. मग पेपर संपलेल्या रात्री त्या विद्यार्थ्याचा पेपर बाहेर काढायचे, संबंधित विद्यार्थ्याला बोलावून त्याला गुपचूप परत पेपर द्यायचे.
इतकंच नाही तर विद्यार्थी हा पेपर घरी घेऊन जायचे आणि दुसऱ्या दिवशी याच उत्तरपत्रिका विद्यापीठात जमा केल्या जात, अशी माहिती पोलिसांनी दिली.