मुंबई : चोरीचे फोन विकत घेतल्याप्रकरणी अटक झाल्यानंतर जामिनावर सुटलेल्या आरोपीचा बस अपघातात मृत्यू झाला. मुंबईच्या 28 वर्षीय राहुल राजपुरोहितला गुजरातमध्ये झालेल्या अपघातात प्राण गमवावे लागले.
राहुलने तीन लाख रुपये किमतीचे चोरीचे फोन विकत घेतले होते.
20 वर्षीय ट्विंकल सोनी आणि 19 वर्षीय टीना परमार यांनी पश्चिम रेल्वेवरील लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशांचे 38 मोबाईल चोरले होते. विशेष म्हणजे ट्विंकल आणि टीना या दोघीही रिशी सिंग नावाच्या तरुणासोबत रिलेशनशीपमध्ये होत्या.
रिशीवर पैसे उधळण्यासाठी दोघींनी मोबाईल फोन्सची चोरी केली होती. चोरलेले फोन रिशी राहुल राजपुरोहितला विकायचा. 5 जून रोजी जीआरपीच्या क्राईम ब्रांचने त्याला अटक केली होती. रेल्वे कोर्टाने तीन दिवसांनी त्याची जामिनावर मुक्तता केली.
मुंबईतील बोरीवलीत राहणारा राजपुरोहित मोबाईलचं दुकान चालवत असे. पार्टनरच्या मृत्यूनंतर त्याने मोबाईल रिपेअरिंगचं काम सुरु केलं.
शाळांना सुट्टी असल्यामुळे राहुलची पत्नी आणि मुलं राजस्थानमधील गावी गेले होते. कुटुंबीयांना परत आणण्यासाठी तो 10 जूनला राजस्थानला निघाला. सुरतला पोहचलं असताना त्याच्या बसची टँकरसोबत धडक झाली. यामध्ये राहुलसह सात प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
आरोपी ट्विंकल सोनी, टीना परमार आणि रिशी सिंग न्यायालयीन कोठडीत आहेत.