विरार : ऐन दिवाळीत विरारमध्ये सव्वाचार कोटीची रोकड लंपास करणारे चोरटे अखेर पोलिसांच्या हाती लागले आहेत. मुख्य चोरासह चोरीच्या घटनेत मदत करणारे आणखी दोन साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर चोरीला गेलेली सव्वाचार कोटी रुपयांची रक्कमही पोलिसांनी जप्त केली आहे.


विरार पश्चिमेकडील बोळींज भागात असलेल्या कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेली कॅशव्हॅनच आरोपी चालकाने 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास पळवून नेली होती. रायटर बिझनेस कंपनीचे कंत्राट असलेली कॅशव्हॅन ठाण्याच्या कापुरबावडी इथून 4 कोटी 53 लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन निघाली होती. त्यातील आजूबाजूच्या तीन एटीएममध्ये 28 लाख रुपये भरण्यात आले. त्यानंतर विरारच्या बोळींज येथील कोटक महिंद्रा बॅंकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी कॅशव्हॅन आली. गाडीतील लोडर आणि बॉडीगार्ड उतरल्यावर चालक रोहित बबन आरु हा कॅशव्हॅनसह पळून गेला होता. वेळ काढण्यासाठी बाथरुमला असल्याचं चालक सांगितलं. मात्र 20 ते 25 मिनिटांनी मोबाईल बंद झाल्याने लोडरने पोलिसांना फोन करुन माहिती कळवली. मात्र तोपर्यंत व्हॅन हायवेपर्यंत पोहोचली होती. 13 नोव्हेंबरला सकाळी एम एच 43 बीपी 4976 या नंबरची कॅशव्हॅन भिवंडी कल्याण बायपास रोडच्या बाजूला सापडली.


कॅशव्हॅन मिळाली त्यात चोरी झालेल्या 4 कोटी 25 लाखांपैकी 2 कोटी 33 लाख 60 हजार रुपयांच्या पाचशे, दोनशे आणि शंभरच्या नोटांची रक्कम मिळून आली. तर चोरटा 1 कोटी 91 लाख 40 हजार रुपयांच्या दोन हजार आणि पाचशेच्या नोटांचे बंडल घेऊन पळाला होता. 2 कोटी 33 लाख 60 हजार रुपयांच्या पाचशे, दोनशे आणि शंभरच्या नोटा असल्याने चोरटा वजन उचलू शकला नाही, त्यामुळे त्याने उर्वरित रक्कम तेथेच ठेवली. त्यानंतर चालत जात शहरात पोहोचला. दुसऱ्या दिवशी त्याने खाजगी टॅक्सी करुन, प्रवास केला. त्या टॅक्सीचालकाला त्याने तब्बल पन्नास हजार टॅक्सीचं भाडं दिलं.



पोलिसांनी या प्रकरणात तिघांना ताब्यात घेतलं आहे. मुख्य आरोपी रोहित आरु हा आहे. तर रोहितचा मित्र अक्षय मोहिते तसेच त्याचा गावचा मित्र चंद्रकात उर्फ बाबुशा गायकवाड यालाही अटक करण्यात आली आहे. रोहित आणि अक्षयने चार दिवसांपासून चोरीच्या घटनेचं नियोजन आखलं होतं. कॅश व्हॅन पळवल्यानंतर अक्षय इको गाडी घेऊन मागून येणार होता. मात्र चोरीनंतर अक्षय आणि रोहितचा संपर्क होऊ शकला नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे तपासणी केल्यानंतर रोहितच्या व्हॅनच्या मागून अक्षयची गाडी दिसत होती. त्यानुसार पोलिसांनी छडा लावला. या चोरीची उकल करण्यासाठी पोलिसांनी पाच पथक नेमली होती. एक पथक त्याच्या गावीही गेलं होतं. आणि त्याच पथकाला गावाहून रोहित आणि त्याला मदत करणारा चंद्रकांत गायकवाड मिळाला. त्यांच्याकडून 1 कोटी 88 लाख 19 हजार 100 रुपये रोख रक्कम मिळाली.


तिघेही आरोपी मित्र असून चालक आहेत. त्यातील अक्षयवर यापूर्वी चोरीचा गुन्हाही दाखल आहे. आरोपी रोहितने चोरीच्या पैशातून दीड लाखाची बुलेटही घेतली होती. ती ही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. रोहितने या पाच दिवसात 1 लाख 70 हजार खर्च ही करुन टाकले होते. या चोरट्यांना आपणं पकडलं जाणारं हे माहित होतं. मात्र पकडल्यावर एकही पैसा पोलिसांना कुठे आहे हे सांगायचं नाही. चोरीची शिक्षा भोगून आल्यावर त्या पैशाने मौज मज्जा करण्याचा त्यांचा इरादा होता मात्र तो इरादा पोलिसांनी हाणून पाडला.


काही दिवासापूर्वी एक कॅमेरा शहरासाठी ही संकल्पना मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तलयामार्फ चालू करण्यात आली होती. त्या संकल्पनेचा फायदाही पोलिसांना या चोरीची उकल करताना झाला. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून, आता पुढील तपास करत आहेत.