मुंबई : केवळ झोप मोड झाल्यामुळे थेट लोकल ट्रेन रुळावरुन पाडायचे प्रयत्न करणाऱ्या एका माथेफिरुला पश्चिम रेल्वेच्या आरपीएफ अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. अनिल वाघेला असे त्याचे नाव असून तो 30 वर्षांचा आहे. मुंबईतील चर्नी रोड स्टेशनजवळ धावत्या लोकलच्या चाकात लोखंडी रॉड फेकून अनिलने लोकलवर आपला राग काढला.


अनिल वाघेला हा बेघर तरुण रोज चर्नी रोड स्टेशनच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर झोपत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून चर्नी रोड स्टेशनजवळ पादचारी पूल दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले होते. या कामामुळे अनिलची झोपमोड होत होती. सतत दहा दिवस झोप मोड झाल्याने मागील शनिवारी (24 ऑक्टोबर) सकाळी 6 वाजून 11 मिनिटांनी एक लोकल चर्नी रोड स्टेशनवरुन जात असताना या माथेफिरुने रस्त्यावर पडलेला तीन फुटांचा लोखंडी रॉड लोकलच्या दिशेने भिरकावला. तो रोड लोकलच्या बॅटरी बॉक्समध्ये जाऊन अडकल्याने मोठा आवाज झाला. त्या लोकलच्या अलर्ट मोटरमनने आवाज ऐकून लगेच गाडी थांबवली आणि खाली उतरुन तो रॉड बाजूला केला.


या घटनेची माहिती त्यांनी आरपीएफला दिल्यानंतर आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरु केला आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून अनिल वाघेला याला अटक केली. अनिलने आपला गुन्हा कबूल केला असून, त्याला रविवारी (25 ऑक्टोबर) कोर्टासमोर हजर करण्यात आले. अनिल वाघेलावर आयपीसी 427 आणि भारतीय रेल्वे कायदा 150 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.