मुंबई : सणासुदीच्या तोंडावर दहशवादी मुंबईला टार्गेट करण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ड्रोनसदृश उपकरणातून हल्ला करण्याचा कट दहशतवाद्यांनी आखल्याचं कळतं. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनंतर मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला असून सुरक्षेत वाढ करण्याची सूचना देण्यात आली आहे. तसंच मुंबई आणि परिसरात ड्रोन तसंच फ्लाईंग ऑब्जेक्ट्स उडवण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे.


सणासुदीच्या दिवसांना सुरुवात झाली असून याचाच फायदा घेत दहशतवादी हल्ला करण्याच्या इराद्यात असल्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहे. मुंबई पोलिसांनी यासंदर्भात सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. यानुसार मुंबईत ड्रोन किंवा तत्सम गोष्टी उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. 30 ऑक्टोबरपासून 28 नोव्हेंबरपर्यंत ही बंदी असेल.


मुंबईमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला? पाकिस्तानमधून फोन, ताज हॉटेल उडवण्याची धमकी


26/11 चा मुंबई हल्ला
26 नोव्हेंबर 2008 हा दिवस मुंबईसाठी काळा दिवस ठरला होता. समुद्रमार्गाने आलेल्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरलं होतं. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईच्या ताज हॉटेलसोबतच इतर 6 ठिकाणांवर हल्ला केला होता. या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 166 लोक मृत्यूमुखी पडले होते, तर 300 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवर सर्वात जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. तर ताज हॉटेलमध्ये 31 लोकांचा मृत्यू झाला होता. सर्व दहशतवाद्यांपैकी फक्त एकाच दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आलं होतं, त्याचं नाव अजमल मोहम्मद कसाब. त्यानंतर 21 नोव्हेंबर 2012 रोजी कसाबला फाशी देण्यात आली.