उल्हासनगरमध्ये अज्ञातांनी रिक्षा पेटवली, घटना सीसीटीव्हीत कैद
एबीपी माझा वेब टीम | 08 May 2018 11:14 PM (IST)
कल्याण जवळील उल्हासनगरमध्ये घराबाहेर उभी केलेली रिक्षा अज्ञातांनी जाळल्याची घटना घडली आहे.
कल्याण : कल्याण जवळील उल्हासनगरमध्ये घराबाहेर उभी केलेली रिक्षा अज्ञातांनी जाळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे उल्हासनगरमध्ये पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कॅम्प ४ परिसरातील आशेळेपाडा परिसरात काल (सोमवार) भगवान गाडे यांनी आपली रिक्षा उभी केली होती. काल मध्यरात्री दोन अज्ञात व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून आले आणि त्यांनी रिक्षा पेटवून दिली. या आगीत रिक्षा संपूर्णपणे जळून खाक झाली. दरम्यान, यापूर्वीही गाडे यांची रिक्षा पेटवण्यात आली होती. त्यानंतर गाडे यांनी तिथं सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. सीसीटीव्हीमुळे सोमवारची घटनाही कॅमेऱ्यात कैद झाली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.