मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी टोलप्रश्नावरुन (Toll) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. ठाणे पासिंग MH 04 च्या गाड्यांना मुंबईत टोल माफ करायचा विचार सुरु आहे, यासंदर्भात सविस्तर बैठक घेऊन लवकरच निर्णय घेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना दिल्याची माहिती आहे. मात्र राज ठाकरे यांनी याबाबत अधिक बोलण्यास नकार दिला. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर उद्या शुक्रवारी 13 तारखेला राज ठाकरेंच्या घरी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीनंतर अधिक माहिती देऊ, असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे काय म्हणाले?
'मी तुम्हाला एकच वाक्य सांगणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली. परंतु या चर्चेनंतर त्याच्या निर्णयापर्यंत येणं याच्यासाठी म्हणून उद्या सकाळी 8 वाजता माझ्या घरी बैठक आहे.त्या बैठकीत काय निर्णय होतो याबाबत मी 10 वाजता पत्रकार परिषद घेऊन सांगेन. मुख्यमंत्री पूर्ण सकारात्मक आहेत.टोलबाबत कोणत्या गोष्टी होणार, काय निर्णय होणार हे मी उद्या सकाळी सांगेन. पोलिसांच्या घराबाबतही चर्चा झाली', अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.
ठाणे पासिंग गाड्यांना मुंबईत टोलमाफी?
MH 04 च्या गाड्यांना टोल माफ करायचा विचार सुरु आहे, यासंदर्भात सविस्तर बैठक घेऊन लवकरच निर्णय घेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना दिल्याचं सांगण्यात येत आहे. 15 दिवस टोलनाक्यावर MSRDC कडून टोलवर व्हिडीओग्राफी केली जाणार त्यात MH 04 च्या गाड्या किती येतजात आहेत यांचा आढावा घेणार त्यानंतर अहवाल सादर केला जाईल. वाशी टोलनाक्यासह इतर टोलनाक्यांवर सोयीसुविधांसाठी लवकरच एक समिती गठीत केली जाणार आहे. याबाबतची चर्चा राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात झाली. दरम्यान, टोल नाक्यांवर पिवळी लाईन गायब असल्याची कबुली MSRDC ने दिली.
राज ठाकरेंचे सवाल
दरम्यान, या बैठकीत राज ठाकरे यांनी जनता रोड टॅक्स देते मग टोलचा भार कशाला असा सवाल नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना केला.
राज ठाकरे बैठकीत कोणते मुद्दे मांडले?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी टोल जवळ किंवा रस्त्यांवर टॉयलेट नाही. येलो लाइनचे नियम पाळले जात नाहीत. ट्रॅफिक असेल तरीही टोल घेतला जातो. गाड्यांची संख्या वाढत असताना टोलवसुली कमी कशी? यासाठी गाड्यांची संख्या मोजण्यासाठी व्हिडिओग्राफी करण्यात यावी. टोल घेऊनही रस्ते खराब असतात. रस्त्यावर अपघात झाला तर लगेच क्रेन, अँम्बुलन्स उपलब्ध होत नाही. रस्ते कर घेतला जातो तर टोल कर कशाला? असे अनेक सवाल उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या बैठकीत मुद्दे मांडले.
मागील अनेक दिवसांपासून मनसे टोलनाक्याच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली.
हेही वाचा :
Raj Thackeray : जनता रोड टॅक्स भरते मग टोल कशाला? राज ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदे यांना सवाल