Mumbai Rain: मुंबईत काही दिवसांत मुसळधार पावसामुळे (Mumbai Rain) अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं समोर आलं आहे. त्यातच मुंबईत मुसळधार पावसामुळे बोरिवलीतील मागाठाणे मेट्रो (Magathane Metro) स्टेशन परिसरातील जागा खचतानाचा दुसरा धक्कादायक व्हिडीओ समोर आला. मेट्रो स्टेशनजवळचा काही भाग मुसळधार पावसामुळे अक्षरश: खचला अन् मेट्रो स्थानकालाही धक्का लागला असल्याचं हा व्हिडिओ पाहिल्यावर वाटतं. मात्र मागाठाणे मेट्रो स्टेशन लगत जमीन खचली कशी? आणि याला जबाबदार कोण? 


बोरिवलीतील मागाठाणे मेट्रो स्टेशनजवळ भूस्खलनाचा दुसरा प्रकार बुधवारी (28 जून) घडला. पाऊस पडत असताना त्याचवेळी मेट्रो स्टेशनजवळ खोदलेल्या खड्ड्यात मेट्रो स्टेशनच्या पायऱ्यांजवळचा काही भाग खचला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. पण थेट मेट्रो स्टेशन लगतची जागा खचल्याने या घटनेवर चिंता व्यक्त केली जात आहे. अजून संपूर्ण पावसाळा बाकी आहे, पावसाला आताच सुरुवात झाली अन् ही घटना घडली. त्यात थेट मेट्रो स्टेशनला लागूनच असलेली जमीन खचल्यामुळे मेट्रो स्टेशनही खचण्याची शक्यता आहे. त्यामुळे या घटनेकडे गांभीर्याने बघण्याची जास्त आवश्यकता आहे.


तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मेट्रो स्टेशनलगतच्या जमिनीला कोटिंग न केल्यामुळे आणि काही इतर कारणास्तव जमीन खचली, त्यामुळे मेट्रो स्टेशनच्या पायात याचे परिणाम होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी एमएमआरडीए, महापालिका, मेट्रो आणि बिल्डर या चौघांचीही चुकी आहे, त्यामुळे संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांनी मेट्रो परिरसरात पाहणी करताना केली.


मागाठाणे मेट्रो जागेवर नक्की काय घडलं?



  • मागाठाणे मेट्रो स्टेशन परिसरात मुसळधार पावसामुळे जमीन खचली.

  • मेट्रो स्टेशनला जोडूनच असलेली जमीन खचली ही बाब मेट्रो प्रशासन, महापालिका अधिकारी, एमएमआरडीए आणि पोलिसांच्या लक्षात येताच त्या परिसरात त्यांनी धाव घेतली.

  • यावेळी या परिसरात खाजगी बिल्डरने खबरदारी न घेता काम केल्यामुळे मेट्रो स्टेशनला जोडून असलेली जमीन आणि महापालिकेच्या अंतर्गत येणारा रस्ता खचला हे निदर्शनास आलं.

  • त्यामुळे कस्तुरबा पोलिसांनी खाजगी बिल्डरचे कंत्राटदार आणि इंजिनीअर यांच्या विरोधात कलम 336 आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.

  • या प्रकरणामध्ये आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आलेली आहे, पोलीस यासंदर्भात पुढील तपास करत आहेत.

  • सध्या खाजगी बिल्डरकडून सुरू असलेलं काम थांबवण्यात आलं आहे, ज्या परिसरात माती खचली तिथे माती टाकण्याचं काम सुरू आहे.

  • या जागेची मेट्रो, महापालिका, एमएमआरडीए आणि पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता, जमिनीच्या भूभागात असलेल्या पाण्याची लाईन फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात माती वाहून गेली आणि त्यामुळे जमीन खचली असल्याचं निदर्शनास आलं.

  • त्यामुळे सध्या पाण्याची लाईन दुसऱ्या मार्गे वळवण्यात आली.


शुक्रवारी मेट्रोस्थानकाच्या उत्तरेकडील टोकाकडे जमीन खचल्याचं समोर आलं होतं, त्यानंतर बुधवारी (28 जून) झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा मेट्रो स्टेशनच्या मध्यभागी शेजारी असलेली जमीन खचल्याचं समोर आलं आहे. जमीन खचल्यामुळे सध्या खबरदारी म्हणून मेट्रो प्रशासनाने आणि पालिकेने जवळील सर्व्हिस रोड आणि मेट्रो स्थानकात जाण्याचा मार्ग आणि लिफ्ट बंद केली आहे. मात्र याचा मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही, असंही मेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. जमीन खचल्यामुळे मेट्रो स्थानकाला काही धोका पोहोचला का? याबाबत त्यांनी अद्याप स्पष्टीकरण दिलेलं नाही. 


या मेट्रो स्टेशन परिसरात खाजगी ग्रुप बिल्डरचा हॉस्पिटल प्रोजेक्ट सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, सध्या या प्रकरणी कस्तुरबा पोलिसांनी बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करत कंत्राटदार आणि इंजिनिअरला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत, त्यामुळे तपासाअंती काय समोर येतं, हे पुढील काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा:


Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीचा उपवास द्वादशीलाच का सोडतात? पाहा त्यामागचं कारण...