Mumbai Coronavirus Cases : मुंबईमध्ये पुन्हा एकदा कोरोना महामारीने (Corona) हाहाकार माजवला आहे. आठ दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णाचा आलेख चढताच राहिलाय. मुंबईसह राज्यातील कोरोनारुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईत आज (शनिवारी) पुन्हा एकदा कोरोना रुग्णाची संख्या 20 हजारांपेक्षा जास्त आढळली आहे. दररोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे बीएमसी प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. पण दररोज हजारोंच्या तुलनेत वाढणारी रुग्णसंख्या आता 20 हजारांच्या पुढे गेली आहे.
बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी मुंबईत 20 हजार 318 इतक्या नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. सहा हजार रुग्णांनी कोरोनावर मात केलाय. तर पाच जणांचा मृत्यू झालाय. आज 1,257 रुग्णांना रुग्णालयात दाखल केले आहे. तर आज आढळलेल्या रुग्णापैकी 16,661 इतक्या जणांना कोणतीही लक्षणे नाहीत. सर्वांवर घरीच उपचार सुरु आहेत. मुंबईतील रिकव्हरी रेट 86 टक्केंवर गेलाय. तर मुंबईचा डबलिंग रेट 47 दिवसांवर आलाय.
मुंबईतील रुग्णसंख्येची आकडेवारी
तारीख | मुंबईतील रुग्णसंख्या |
21 डिसेंबर | 327 |
22 डिसेंबर | 490 |
23 डिसेंबर | 602 |
24 डिसेंबर | 683 |
25 डिसेंबर | 757 |
26 डिसेंबर | 922 |
27 डिसेंबर | 809 |
28 डिसेंबर | 1377 |
29 डिसेंबर | 2510 |
30 डिसेंबर | 3671 |
1 जानेवारी | 6347 |
2 जानेवारी | 8063 |
3 जानेवारी | 8082 |
4 जानेवारी | 10860 |
5 जानेवारी | 15166 |
6 जानेवारी | 20181 |
7 जानेवारी | 20971 |
मुंबईकरांची चिंता वाढतेय, पण घाबरून जाण्याचे कारण नाही ; BMC महापौर किशोरी पेडणेकर
"मुंबईत कोरोना रूग्ण वाढत आहेत. परंतु, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, कोरोना विरोधातील लढाईसाठी पालिकेची पूर्ण तयारी झाली आहे. पालिका रूग्णालयांमध्ये अडीच हजार बेड उपलब्ध आहेत. बीकेसीत आतापर्यंत एकही आयसीयूतील रूग्ण नाही. 20 हजार पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 17 हजार लक्षणे नसलेले रूग्ण आहेत. कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या कमी आहे," अशी माहिती महापौर पेडणेकर यांनी यावेळी दिली.
मुंबई पोलिसांना कोरोनाचा विळखा
निवासी डॉक्टरानंतर आता पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आज (शुक्रवारी) मुंबईत तब्बल 93 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची झाली आहे. कोरोनाच्या वाढता धोक्यामुळे पोलिसांनाही संकटाचा सामना करावा लागतोय. जनतेच्या सेवेसाठी महाराष्ट्र पोलिसांना 24 तास रात्रंदिवस कामावर रुजू व्हावे लागत आहे. आतापर्यंत 9 हजार 657 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा कहर सुरु असल्यामुळे धोका पत्करून पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत.