मुंबई : पावसाळ्यात नाले तुंबून रोगराई पसरु नये यासाठी पावसाळा सुरु होण्यापूर्वीच मुंबईतल्या नाल्यांची सफाई करावी, असी मागणी केली जाते. परंतु दरवर्षीप्रमाणे पालिका प्रशासन यंदादेखील नालेसफाईचे काम पूर्ण करु शकलेले नाही. त्यामुळे यंदादेखील मोठ्या पावसात मुंबईकरांचे हाल होणार असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला आणि विद्याविहार रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळालगतच्या नाल्यांची सफाई पूर्ण झालेली नाही. तसेच कुर्ल्याजवळ हार्बर रेल्वेमार्गावरील रेल्वे रुळालगतच्या नाल्यांचीदेखील सफाई योग्य पद्धतीने झालेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात नाले तुंबून रेल्वे रुळांवर पाणी साचेल. परिणामी मध्य आणि हार्बर रेल्वे ठप्प होण्याची शक्यता आहे.

विद्याविहार रेल्वेस्थानकाजवळ एक नाला आहे. हा नाला रेल्वे रुळाखालून वाहतो. दरवर्षी पावसाळ्यात या ठिकाणी पाणी तुंबते, त्यामुळे नाल्यातील पाणी रेल्वे रुळावरून वाहते. परिणामी मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ठप्प होते. मुंबई महापालिका प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाने यावर्षीदेखील या नाल्याकडे दुर्लक्ष केल्यास या नाल्यातील कचऱ्यामुळे पावसाचे पाणी रेल्वे रुळांवर साचून मध्य आणि हार्बर रेल्वे बाधित होऊ शकते.