Mumbai Local Train कोरोना संसर्गापासून (Corona) बचावासाठी म्हणून संपूर्ण जगात आणि देशातही सावधगिरीची पावलं उचलण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर अनेक सेवा ठप्प झाल्या आणि जगण्याची परिभाषा बदलली. कधीही न थांबणारी आणि थकणारी मुंबई आणि मुंबई लोकलही काही महिन्यांसाठी यार्डातच उभी राहिली. अखेर टप्प्याटप्प्यानं शासनानं लोकलच्या प्रवासास मुभा देत सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकलसेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य शासनानं अत्यंत महत्त्वाचा निर्णय़ घेत आणि नागरिकांच्या मागणीचा विचार करत अखेर काही निर्धारित वेळांमध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी रेल्वेनं प्रवास करण्याची मुभा दिली आहे. 'अनलॉकिंग' आणि 'मिशन बिगिनम'धील ही आतापर्यंतची बहुप्रतिक्षित अशीच घोषणा ठरत आहे.
मुंबई लोकल जवळपास 22 मार्च 2020पासून बंद करण्यात आली होती. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. ज्यानंतर कोरोना काळात कार्यरत असणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी शासनानं लोकल प्रवासाची मुभा दिली. त्या पुढच्याच टप्प्यात अत्यावश्यक विभागात आणखी काही उपविभाग करत यामध्येही अन्य कर्मचाऱ्यांसाठी लोकल प्रवासाचा मार्ग शासनानं खुला केला होता.
टप्प्याटप्प्यानं नियमांमध्ये शिथिलता आणली जात असतानाच रेल्वे सेवा पूर्ववत आणण्यासाठी शासन प्रयत्नशील दिसलं. त्याच धर्तीवर आणि महिला वर्गाला प्राधान्य देत नवरात्रोत्सवाच्या दिवसांमध्ये वेळांच्या मर्यादांसह प्रशासनाकडून सरसकट सर्व महिलांच्या रेल्वे प्रवासाला परवानगी देण्यात आली.
महिलांना रेल्वे प्रवासाची मुभा दिल्यानंतर इतरही नागरिकांमधून रेल्वेसेवा सुरु करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. रेल्वेसेवा पूर्ववत होण्यास लागणारा विलंब पाहता प्रवाशांमध्ये कमालीची नाराजीही पाहायला मिळाली. पण, अखेर नागरिकांचं हित आणि त्यांच्या मागण्याचा विचार करत सर्वसामान्यांसाठी रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.
पश्चिम आणि मध्य रेल्वेने लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच सर्वांसाठीच्या रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यामुळं सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. पण, रेल्वे प्रसासाठी दिलेली तीन टप्प्यांतील वेळमर्यादा हा मुद्दा मात्र अद्यापही नाराजीचा सूर बळावून जात आहे ही महत्त्वाची बाब.