मुंबई: मुंबईत रात्री झालेल्या पावसानं पुन्हा एकदा लोकलच्या वेगाला ब्रेक लागला आहे. पश्चिम, हार्बर आणि मध्य या तीनही रेल्वे मार्गावरची लोकल उशिरानं धावते आहे.

 

पश्चिम रेल्वे १५ मिनिटं तर मध्य आणि हार्बर रेल्वे २० मिनिटं उशिरानं धावते आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे आजही सकाळी बाहेर पडलेल्या लोकांना खोळंब्याच्या त्रासाला तोंड द्यावं लागतं आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वीच तीनही रेल्वेमार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. त्यावेळेसही प्रवाशांना बराच त्रास सहन करावा लागला होता.

 

तर काल रात्रभर अंधेरी, पवई, जोगेश्वरी या भागात थोड्या-थोड्या अवधीनं पावसाची रिपरिप सुरुच राहिली. केवळ रिमझिम पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्यानं मुंबई महापालिका नेहमीप्रमाणे यंदाही आपल्या दाव्यांवर साफ खोटी ठरली..

 

शुक्रवारी सकाळी 8 ते आज पहाटे वाजेपर्यंत मुंबई शहरात 73 मिमी, पश्चिम उपनगरात 74.43 मिमी, तर पूर्व उपनगरात 107.79 मिमी पावसाची नोंद झाली. शिवाय येत्या २४ तासात मुंबई आणि कोकणात पावसाचा जोर आणखीन वाढेल., असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.