मुंबई :  पश्चिम रेल्वेवरील (Western Railway) खार ते गोरेगाव दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. या कामासाठी पश्चिम रेल्वेकडून ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकच्या परिणामी लोकलच्या फेऱ्या (Mumbai Local) कमी झाल्या असून प्रवाशांचे गर्दीमुळे हाल झाले आहेत. लोकल हालातून वाचण्यासाठी प्रवाशांनी इतर वाहतुकीचा पर्याय निवडला. हाच पर्याय महामेट्रोच्या पथ्यावर पडला आहे.  मुंबईतील महामेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली. सोमवारी, एकाच दिवशी अडील लाख प्रवाशांनी प्रवास केला. 


मुंबई लोकलच्या काही मोजक्या फेऱ्या रद्द झाल्या तरी प्रवाशांची मोठी गर्दी उसळते. सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी दरररोज 200 हून अधिक लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. एवढ्या प्रमाणात लोकलच्या फेऱ्या रद्द झाल्याने लोकलची संख्या कमी झाली. परिणामी लोकल ट्रेनमधून प्रवास करणे जिकरीचे झाले. अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली होती. काही ठिकाणी चेंगराचेंगरी सदृष्य स्थितीदेखील निर्माण झाली होती. अनेकांनी लोकल ट्रेन ऐवजी खासगी वाहनांचा पर्याय स्वीकारल्याने रस्त्यावरही वाहतूक कोंडी झाली. 


पश्चिम रेल्वेवर सुरू असलेल्या गोंधळाचा फायदा महामेट्रोला झाला असल्याचे समोर आले आहे. प्रवाशांनी लोकलऐवजी मेट्रोने प्रवास करणाऱ्यावर भर दिला. सोमवारी, 30 ऑक्टोबर रोजी एका दिवसात मेट्रो 2 ए आणि 7 ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अडीच लाखांहून अधिक होती. 


मेट्रो 2 ए दहिसर पूर्व ते डी. एन. नगर पर्यंत तर मेट्रो 7 दहिसर पूर्व ते गुंदवलीपर्यंत धावते. या दोन्ही मेट्रो लाईन संलग्न आहेत. या मार्गिकेवरून जेव्हापासून मेट्रो वाहतूक सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत एकाच दिवसात अडीच लाख प्रवाशांनी पहिल्यांदाच प्रवास केला आहे. 







 पश्चिम रेल्वेवर खार-गोरेगाव स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. या कामासाठी सध्या पश्चिम रेल्वेकडून ब्लॉक (Block On Western Railway) घेण्यात येत आहे. या ब्लॉकमध्ये दररोज लोकलच्या किमान 200 हून अधिक फेऱ्या रद्द करण्यात येत आहेत. दररोज एवढ्या प्रमाणात लोकलच्या फेऱ्या रद्द होत असल्याने प्रवाशांचे विशेषत: महिलांचे हाल होत आहे. प्रवाशांमध्ये असलेल्या संतापाची दखल घेता पश्चिम रेल्वेने ब्लॉगबाबत मोठा निर्णय घेतला आहे. एक नोव्हेंबर 2023 आणि दोन नोव्हेंबर रोजी पश्चिम रेल्वेने काही लोकल रद्द न करण्याचा निर्णय घेतला आहे.