मुंबई :  पश्चिम रेल्वेवर (Western Railway) खार-गोरेगाव स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. या कामासाठी सध्या पश्चिम रेल्वेकडून ब्लॉक (Block On Western Railway) घेण्यात येत आहे. या ब्लॉकमध्ये दररोज लोकलच्या किमान 200 हून अधिक फेऱ्या रद्द करण्यात येत आहेत. दररोज एवढ्या प्रमाणात लोकलच्या फेऱ्या रद्द होत असल्याने प्रवाशांचे विशेषत: महिलांचे हाल होत आहे. प्रवाशांमध्ये असलेल्या संतापाची दखल घेता पश्चिम रेल्वेने ब्लॉगबाबत मोठा निर्णय घेतला आहे. एक नोव्हेंबर 2023 आणि दोन नोव्हेंबर रोजी पश्चिम रेल्वेने काही लोकल रद्द न करण्याचा निर्णय घेतला आहे. 


मुंबई लोकलच्या काही मोजक्या फेऱ्या रद्द झाल्या तरी प्रवाशांची मोठी गर्दी उसळते. सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी दरररोज 200 हून अधिक लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. एवढ्या प्रमाणात लोकलच्या फेऱ्या रद्द झाल्याने लोकलची संख्या कमी झाली. परिणामी लोकल ट्रेनमधून प्रवास करणे जिकरीचे झाले. अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली होती. काही ठिकाणी चेंगराचेंगरी सदृष्य स्थितीदेखील निर्माण झाली होती. अनेकांनी लोकल ट्रेन ऐवजी खासगी वाहनांचा पर्याय स्वीकारल्याने रस्त्यावरही वाहतूक कोंडी झाली. 


पश्चिम रेल्वेच्या या ब्लॉकच्या निर्णयावर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. अखेर पश्चिम रेल्वेने काही लोकलच्या फेऱ्या रद्द न करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 नोव्हेंबर रोजी म्हणजे बुधवारी रद्द असणाऱ्या 316 लोकलपैकी 204 लोकल रद्द करून उर्वरित 112 लोकल सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच 2 नोव्हेंबर रोजीदेखील 316 पैकी 204 लोकल रद्द ठेऊन 112 लोकल सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे. 


पश्चिम रेल्वेवर खार-गोरेगाव स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू असून पश्चिम रेल्वे मार्गावरील 27 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबपर्यंत या 11 दिवसांत 2500 हून अधिक लोकलच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. 27 आणि 28 ऑक्टोबर रोजी प्रत्येकी 256 फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. तर रविवारी 116 अप आणि 114 डाऊन अशा एकूण 230 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.  


सहाव्या मार्गिकेच्या जोडणीचं काम 7 ऑक्टोबरपासून सुरू झालं असून 26 दिवस रूळजोडणीचं काम सुरू राहणार आहे. 26 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत रूळ जोडणीचं मुख्य काम सुरू आहे. रूळजोडणीच्या कामासाठी रुळांवरील वाहतूक थांबवणं गरजेचं आहे. मुंबई लोकल सलग काही दिवस बंद ठेवणं शक्य नसल्यानं ब्लॉककाळात काही लोकल आणि मेल-एक्स्प्रेस फेऱ्या रद्द करण्यात  आल्या. 


सहाव्या मार्गिकेचा मोठा फायदा 


नव्या मार्गिकेची सध्याच्या रुळांवर जोडणी देण्याचं काम नोव्हेंबरमध्ये पूर्ण होईल. रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून तपासणी केली. तपासणीनंतर लोकल चालवण्यात येणार आहेत. सहाव्या मार्गिकेमुळे वाढीव लोकल फेऱ्या चालवण्यासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सध्याच्या लोकल फेऱ्यांच्या एकूण क्षमतेत 20 टक्क्यांची वाढ होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.