Mumbra Local Train Accident: मध्य रेल्वेच्या मुंब्रा स्थानकाजवळ सोमवारी 13 प्रवासी चालत्या लोकल ट्रेनमधून खाली पडले. यामध्ये चार प्रवाशांचा मृत्यू झाला. तर उर्वरित प्रवाशी जखमी झाले आहेत. मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन फास्ट मार्गावरुन दोन लोकल ट्रेन (Local Train) परस्परविरुद्ध दिशेला जात असताना हा अपघात घडला. या दोन्ही ट्रेन आजुबाजूच्या ट्रॅकवरुन जात होत्या तेव्हा दारात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या बॅगचा धक्का लागून 13 जण खाली पडल्याचे कारण मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले होते. मात्र, आता या अपघातप्रकरणात एक नवीन पैलू समोर आला आहे. मुंब्रा येथील हा लोकल ट्रेनचा अपघात लोखंडी रॉडमुळे झाला असावा, असा संशय मध्य रेल्वेला आहे. (Raiway Accident in Mumbai)
प्राथमिक माहितीनुसार, ज्या लोकल ट्रेनमधून प्रवासी खाली पडले त्या ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर ओरखडे आढळून आले आहेत. तसेच ट्रेनमधून पडलेल्या एका प्रवाशाने, 'आम्हाला काहीतरी लागल्यासारखं वाटले, असे सांगितले. आम्ही खाली पडण्यापूर्वी आम्हाला भिंतीला धडकल्यासारखं वाटलं', असे त्याने म्हटले. त्यामुळे ही 'अज्ञात' गोष्ट म्हणजे लोखंडी रॉड असावा, असा संशय मध्य रेल्वेला आहे. त्यादृष्टीने मध्य रेल्वेकडून दुर्घटनेचा तपास केला जात आहे. तर दुसऱ्या थिअरीनुसार अपघाताच्या वेळी दोन्ही लोकल ट्रेनमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रवासी होती. हे प्रवासी फुटबोर्डवर उभे होते. त्यांचा एकमेकांना धक्का लागून ते खाली पडल्याचे सांगितले जात आहे. यासाठी मध्य रेल्वेच्या पथकाने काल अपघातानंतर घटनास्थळाची पाहणी केली. यानंतर दोन्ही रेल्वे ट्रॅकमधील अंतर मोजण्यात आले. त्यामुळे आता या प्राथमिक चौकशीतून कोणती माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मुंब्रा रेल्वे स्थानकातील अपघातानंतर प्लॅटफॉर्म नंबर 4 वर आर पी एफ,जी आर पी एफ आणि लोकल पोलीस तैनात आहेत. काल दोन ट्रक मधील अंतर रेल्वे इंजिनियर्सकडून मोजण्यात आला. सध्या प्लॅटफॉर्म नंबर तीन आणि चार अप डाऊन मार्गाने ये जा करणाऱ्या लोकल आणि मेल एक्सप्रेस गाड्या वळणावरून धिम्या गतीने पुढे मार्गस्थ होत आहेत.
Central Railway: भाजप नेते किरीट सोमय्या मध्य रेल्वेला जाब विचारणार
मुंब्रा लोकल ट्रेन अपघातानंतर भाजपचे किरीट सोमय्या मध्य रेल्वेला जाब विचारणार आहेत. मुंब्र्यात काय झालं?कसं झालं?कोण जबाबदार असे सवाल ते मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांना विचारणार आहेत. मुंब्रा दुर्घटनेचा तपास होणं आणि जबाबदारी निश्चित करणं गरजेचे आहे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज मध्य रेल्वेच्या विरोधात धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. ठाण्यातील गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्थानक सकाळी नऊ वाजता मोर्चाची सुरुवात होईल. मनसे नेते अविनाश जाधव सह ठाणेकर रेल्वे प्रवासी देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.
आणखी वाचा