Mumbai Local Train Accident: मध्य रेल्वेमार्गावरील मुंब्रा स्थानकाजवळ सोमवारी सकाळी 13 प्रवासी चालत्या लोकल ट्रेनमधून खाली पडले होते. यापैकी चार प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर दोन प्रवासी गंभीररित्या जखमी आहेत. उर्वरित प्रवाशांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंबई उपनगराला अगदी लागूनच असलेल्या मुंब्रा परिसरात 13 प्रवासी चालत्या लोकल ट्रेनमधून (Mumbai Local Train) खाली पडल्यामुळे देशभरात या घटनेची चर्चा रंगली होती. मात्र, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी काल सकाळपासून एकदाही प्रसारमाध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर येऊन या घटनेबाबत प्रतिक्रिया देण्याची तसदी घेतली नाही. 'मोदी 3.0' सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सोमवारी दिल्लीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा (J P Nadda) यांच्यासह अश्विनी वैष्णवही उपस्थित होते. यावेळी एक पत्रकार परिषदही पार पडली. त्यावेळी एका 'दैनिक लोकसत्ता'च्या पत्रकाराकडून रेल्वेमंत्री अश्निनी वैष्णव यांना मुंबईतील ट्रेन अपघातावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा अश्निनी वैष्णव यांनी या विषयावर बोलणे टाळले. रेल्वे मंत्रालयाने मुंबईतील अपघाताबाबत पत्रक काढले आहे. त्यामुळे या मुद्द्यावर अधिक बोलण्याची आवश्यकता नाही, असे सांगून रेल्वेमंत्री तिथून निघून गेले.
Mumbai Railway: मुंबईतील भगिनींचे 'कुंकू' सिंदूर नाही का? प्रवासी संघटनेचा संतप्त सवाल
या अपघातानंतर मुंबईकरांकडून संताप व्यक्त केला जात आहे. मुंबई आणि मुंबईकर भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. दररोज लोकल ट्रेन अपघातात बळी जातात. मुंबईतील भगिनींचे कुंकू सिंदूर नाही का, असा सवाल रेल्वे प्रवासी संघटनेने केंद्र सरकारला विचारला आहे. मुंबईतील रेल्वे प्रवाशांच्या मरणयातना कधी संपणार? गेल्या 10 वर्षात भारतीय रेल्वेने प्रगतीची भरारी घेतली, असे सांगितले जाते. मग मुंबईतील रेल्वे अपघात कमी का होत नाहीत? आजच्या घटनेची पूर्वसूचना आम्ही रेल्वेला दिली होती. दिवा ते कळवा गर्दी होत असल्याने वळणावर ट्रेन झुकते आहे, याबद्दल माहिती दिली गेली होती. पण रेल्वेने यावर कोणतीही कार्यवाही केली नाही, असा आरोप रेल्वे प्रवासी संघटनेने केला.
आणखी वाचा
मुंबईकरांसाठी 'लोकल'च्या तीन नव्या डिझाईन; मुंब्रा अपघातानंतर रेल्वेमंत्र्यांनी घेतली बैठक
मुंबई रेल्वेसाठी एक वेगळं महामंडळ हवं; राज ठाकरेंची मागणी, उद्याच मनसेचा मोर्चा धडकणार