मुंबई : मुंबईत (Mumbai) आज रात्रीपासून लोकल ट्रेनच्या (Local Train) हार्बर मार्गावर (Harbour Line) 38 तासांचा मेगाब्लॉग सुरु होणार आहे. हा ब्लॉक बेलापूर आणि पनवेल दरम्यान 30 सप्टेंबर रात्री 11 वाजल्यापासून 2 ऑक्टोबरच्या दुपारी 1 वाजेपर्यंत सुरु राहिल. हा ब्लॉक सुरु असताना हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर बेलापूर आणि पनवेल स्टेशनदरम्यान उपनगरीय सेवा बंद राहतील. यामुळे पनवेलवरुन सीएसएमटीकडे जाणाऱ्या तसंच येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात प्रवास करण्याचा विचार करत असाल तर मेगाब्लॉकचं वेळापत्रक बघूनच बाहेर पडा, असं आवाहन करण्यात येणार आहे. 


डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरसाठी मेगाब्लॉक


मालवाहतुकीसाठी समर्पित असणाऱ्या 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'च्या कामासाठी हार्बर मार्गावर 38 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या दोन नवीन अप आणि डाऊन मार्गिकांच्या बांधकामाबरोबरच पनवेल उपनगरीय रिमॉडेलिंग कामासाठी बेलापूर-पनवेलदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.


कशी असेल सेवा?


या मेगाब्लॉकच्या काळात  हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील बेलापूर आणि पनवेल स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसतील. हार्बर मार्गावर अप आणि डाऊन उपनगरीय सेवा बेलापूर, नेरुळ आणि वाशी स्टेशनपर्यंत चालवल्या जातील. तर ट्रान्सहार्बर मार्गावर अप आणि डाऊन उपनगरीय सेवा केवळ ठाणे आणि नेरुळ/वाशी स्टेशनदरम्यान सुरु राहिल.


दरम्यान हा मेगाब्लॉक सुरु होण्यापूर्वी सीएसएमटीहून पनवेलसाठी शेवटची लोकल रात्री 9 वाजून 2 मिनिटांनी सुटणार आहे. ही लोकल ट्रेन रात्री 10 वाजून 22 मिनिटांनी पनवेल स्थानकात दाखल होईल. तर अप हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वी पनवेलहून सुटणारी शेवटची लोकल शनिवारी रात्री 10 वाजून 35 मिनिटांनी सुटेल. ही लोकल 11 वाजून 54 मिनिटांनी CSMT स्थानकात दाखल होईल. यानंतर लोकल सेवा बंद असणार आहे.


रविवारी ब्लॉक नाही


हार्बर मार्गावर 38 तासांचा मेगाब्लॉक असल्याने रविवारी मध्य रेल्वेवर ब्लॉक घेतला जाणार नाही. याशिवाय पश्चिम रेल्वेवर देखील ब्लॉक नसेल. मागील आठवड्यात रविवारी देखील गणेशोत्सावामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ब्लॉक घेतलेला नव्हता.


मेगाब्लॉकनंतर 2 ऑक्टोबर रोजी लोकलचं वेळापत्रक



  • मेगाब्लॉकनंतर सीएसएमटीहून पहिली लोकल 12 वाजून 08 मिनिटांनी रवाना होईल, जी 13.29 वाजता पनवेलला पोहोचेल.

  • तर पनवेलहून सीएसएमटीसाठी पहिली लोकल ट्रेन 13.37 मिनिटांनी रवाना होईल. ही ट्रेन 14.56 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.

  • तर ठाण्याहून पनवेलला पहिली लोकल ट्रेन 13.24 मिनिटांनी रवाना होईल, जी 14.16 मिनिटांनी पनवेलला पोहोचेल.

  • याशिवाय पनवेलहून ठाण्याला पहिली लोकल ट्रेन 14.01 वाजता रवाना होईल आणि 14.54 वाजता ठाण्याला पोहोचेल.


हेही वाचा


Mumbai Local : मोटरमनच्या हलगर्जीपणाचा प्रवाशांना फटका, नालासोपारा लोकल ट्रेन चक्क स्टॅापिंग यलो पट्टीच्या पुढे थांबली