मुंबई: मुसळधार पावसामुळे मुंबई ते कल्याण (Mumbia Local CSMT To Kalyan) मार्गावर चालणाऱ्या लोकल सेवा ठप्प झाल्यामुळे प्रवाशांना फटका बसत आहे. अशात ठाकुर्लीनजीक एक दुर्दैवी घटना घडली आहे. अंबरनाथ लोकल ठाकुर्लीजवळ (Ambernath Local News) दोन तास थांबली असता एक महिला तिच्या सहा महिन्याचे बाळ आणि तिच्या काकासह रेल्वे ट्रॅकवर उतरली. त्यावेळी त्या काकाच्या हातून बाळ निसटलं आणि ते वाहत्या पाण्यात पडलं. आज दुपारी 3 वाजता ही दुर्दैवी घटना घडली.


ठाकुर्ली ते कल्याण दरम्यान रेल्वे थांबल्यानंतर बाळाची आई लोकलमधून उतरली आणि ही दुर्दैवी घटना घडली. लोकल दोन तास थांबल्यानंतर ती आई तिच्या काकासह खाली उतरली. त्यावेळी तिच्या काकाच्या हातातून ते सहा महिन्याचं बाळ निसटलं आणि बाजूला असलेल्या नाल्यातील वाहत्या पाण्यात पडलं. 


मुंबईसह परिसरात आज मुसळधार पाऊस पडल्याने मध्य मार्गावरील वाहतूक कोलमडली. त्यामुळे सीएसटीएम ते डोंबिवली दरम्यान लोकल सुरू होत्या. त्याच्या पुढील लोकल बंद करण्यात आल्या आहेत.  


दरम्यान, या ठिकाणी कल्याण लोहमार्ग पोलिस दाखल झाले असून त्यांनी शोध सुरू केला आहे. हा नाला ज्या ठिकाणी आहे तो नाला पुढे जाऊन खाडीला मिळतो. त्यामुळे अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळू शकली नाही. 


लोकल ज्या ठिकाणी थांबली होती त्याच्या बाजूला नाला होता. या नाल्यावरून लहान खांबावरून चालताना हे बाळ निसटल्याची माहिती आहे. या दुर्दैवी घटनेनंतर आता प्रवाशांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.


Mumbia Local CSMT To Kalyan : डोंबिवलीच्या पुढे वाहतूक हळूहळू सुरळीत


मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे सीएसएमटी ते कल्याण दरम्यान वाहतूक खोळंबली होती. लोकल डोंबिवलीपर्यंतच धावत होत्या. आता हळूहळू त्या पुढील मार्गावरही लोकल धावायला सुरू होत आहेत. पण यामुळे सीएसएमटी आणि ठाणे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाल्याचं चित्र आहे. 


सीएसएमटी ते कसारा दरम्यान रेल्वेसेवा आता सुरू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे अडकून बसलेल्या प्रवाशांसाठी हा दिलासा आहे. 


दरम्यान, पुढील 48 तासात मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरात ज्या ठिकाणी पूर परिस्थितीची शक्यता आहेत त्या ठिकाणी NDRF च्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.


ही बातमी वाचा: 


Sindhudurg Rains:  सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची हजेरी; नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा