मुंबई : मुंबईची लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या लोकलच्या प्रवासी संख्येत सध्या मोठी घट झालेली दिसतेय. कोरोनापूर्व काळात दररोज सरासरी 80 लाख प्रवासी लोकलचा प्रवास करायचे. आता ही संख्या 30 लाखांवर आली आहे. यामध्ये लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या 5 लाख प्रवाशांनी मासिक पास काढला आहे. 


कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांना लोकलचा प्रवास करण्याची मूभा राज्य सरकारने दिली आहे. पण मुंबई शहराचा विचार करता अद्याप मोठ्या लोकसंख्येला कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस मिळाले नाही. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या ताज्या आकडेवारीनुसार, कोरोनाच्या दोन्ही लसी घेतलेल्या केवळ 4.94 लोकांनी लोकलचा मासिक पास काढला आहे. ही आकडेवारी 11 ऑगस्ट ते 31 ऑगस्टच्या दरम्यानची आहे. 


सध्या सरासरीपेक्षा अर्ध्याहून कमी लोकसंख्या ही लोकलने प्रवास करते. त्यामध्ये मध्य रेल्वे मार्गावर 19 लाख प्रवासी तर पश्चिम रेल्वे मार्गावर 11 लाख प्रवासी रोजचा प्रवास करत असल्याचं दिसून आलं आहे. जोपर्यंत रेल्वे प्रशासन सिंगल जर्नी टिकीट देण्यास सुरुवात करत नाही तोपर्यंत प्रवाशांच्या संख्येत वाढ होणार नाही असं काही प्रवासी संघटनांनी मत व्यक्त केलं. तसेच अनेक ठिकाणाहून येणाऱ्या लोकल गाड्या अद्याप सुरु नाहीत. पनवेल, दीवा आणि वाशीहून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. 


राज्य शासनाने आखून दिलेल्या नियमांचे आपण काटेकोरपणे पालन करत असून आपल्याला केवळ मासिक पास देण्याचे आदेश असल्याचं रेल्वे प्रशासनाने सांगितलं आहे. युनिव्हर्सल ट्रॅव्हल टिकीट सॉफ्टवेअरमुळे रेल्वे स्टेशन आणि टिकीट बूथवर प्रवाशांची नेहमी दिसणारी गर्दी आता कुठेच दिसत नाही. 


संबंधित बातम्या :