Mumbai Local Megablock: मुंबईकरांनो, आज रविवारच्या सुट्टीच्या दिवशी कुठे फिरण्यासाठी बाहेर जाण्याचा प्लान करत असाल, तर सर्वात आधी मुंबई लोकलचं टाईमटेबल जाणून घ्या. आज मध्य रेल्वे (Megablock on Central Railway) आणि हार्बर मार्गांवर (Megablock on Harbour Railway) मेगाब्लॉक (Megablock News) आहे. त्यातल्या त्यात दिलासा म्हणजे, आज मुंबईच्या (Mumbai News) पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नाही. ट्रॅक, ओव्हरहेड आणि सिग्नलिंग उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पश्चिम रेल्वेवर 18 आणि 19 फेब्रुवारीच्या मध्यरात्री, 12 ते पहाटे 4 या वेळेत मुंबई सेंट्रल आणि माहीम स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर चार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याव्यतिरिक्त दिवसभर मेगाब्लॉक नसणार आहे. 


मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे तुम्ही घराबाहेर पडणार असाल आणि मुंबई लोकलच्या मध्य आणि हार्बर मार्गांवरुन प्रवास करणार असाल, तर तुमच्या प्रवासाचं नियोजन तसं कराल. मध्य रेल्वेवर विद्याविहार - ठाणेदरम्यान पाचव्या आणि सहाव्या लाईनच्या कामसाठी सकाळी 11.00 ते दुपारी 3.30 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. तर  CSMT ते चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. 


मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक 


मध्य रेल्वेवर विद्याविहार ते ठाणे दरम्यान, पाचवी आणि सहावी लाईन सकाळी 11 ते दुपारी 3.30 पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. 


ब्लॉक कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या डाऊन आणि अप मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि विद्याविहार दरम्यान, डाऊन आणि अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि वेळेपेक्षा 10 ते 15  मिनिटं उशिराने धावतील. 


हार्बर मार्गावर मेगाब्लॉक 


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे हार्बर लाईन सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत ब्लॉक असेल.


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड इथून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.


पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे इथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. दरम्यान, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
 
हार्बर मार्गांवरील प्रवाशांना मेगाब्लॉकमुळे खास सूट 


हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरुन प्रवास करण्याची परवानगी असेल. या पायाभूत सुविधा अपग्रेड ब्लॉकमुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.