Navneet Rana Taunted Uddhav Thackeray: शिवसेनेच्या (Shiv Sena) निवडणूक चिन्हावरून सुरू असलेला वाद शुक्रवारी संपुष्टात आला. निवडणूक आयोगाने शिवसेना आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह 'धनुष्यबाण' हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील गटाला दिले आहे. यावरून आता अमरावतीचे खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना टोला लगावला आहे. नवनीत राणा यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्या म्हणाल्या आहेत की, 'जो रामाचा नाही, जो हनुमानाचा नाही, तो काही कामाचा नाही आणि धनुष्यबाणही त्याचा नाही... त्याचाच परिणाम आज जाणवला आणि उद्धव ठाकरे यांना भोलेनाथांनी खूप चांगला प्रसाद दिला आहे.'
1966 नंतर पहिल्यांदा ठाकरे कुटुंबीयांनी पक्षावरील नियंत्रण गमावले
बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 मध्ये शिवसेना (Shiv Sena) पक्षाची स्थापना केली होती. पक्ष स्थापनेनंतर पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबीयांचा शिवसेना पक्षावरील ताबा सुटण्याची वेळ आली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर टीका केली आहे. ठाकरे गटाचे काही नेते याला सूडाचं राजकारण म्हणत आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा विरोधी पक्षांकडूनही निषेध करण्यात आला आहे. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हटलं आहे की, नवीन चिन्ह घ्यायचं, लोक नवीन चिन्ह स्वीकारतात.
हा निर्णय म्हणजे राजकीय हिंसाचार : संजय राऊत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटालाच खरी शिवसेना मानण्याच्या निवडणूक आयोगाच्या (EC) निर्णयावर उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शनिवारी टीका केली आहे. राऊत यांनी हा निर्णय पक्षाला नष्ट करण्याच्या उद्देशाने राजकीय हिंसाचाराचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. हे सुडाचं राजकारण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाचा हा निर्णय कायदा, संविधान आणि जनतेच्या इच्छेचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. सरकारने नव्याने निवडणुका घ्याव्यात आणि शिवसेना कुणाची आहे, असा जनादेश जनतेकडून घ्यावा, असे आव्हान त्यांनी दिले. तसेच या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.