मुंबई : मुंबईतील तीनही उपनगरीय रेल्वे मार्गांवर आज (रविवार) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ट्रॅक आणि ओव्हरहेडच्या दुरुस्तीसह देखभालीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत तर हार्बरवर सकाळी 11.40 ते सायं. 4.40 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर पालघर येथे नवीन पुलासाठी स. 10.15 ते दुपारी 1 पर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे.


मेगाब्लॉक दरम्यान बहुतांश लोकल गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावतील.

मध्य रेल्वे

  • मध्य रेल्वेवर ठाणे आणि दिवा स्थानकादरम्यान अप धिम्या मार्गावर स. 9 ते सायं. 6 पर्यंत ब्लॉक घेणार आहे. तर मुंब्रा ते कळवा स्थानकादरम्यान नवीन पाचव्या आणि सहाव्या अप धीम्या मार्गासाठी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

  • दिवा स्थानकातून निघणाऱ्या अप धीम्या/अर्धजलद लोकल स. 9.07 ते सायं. 6.02 पर्यंत दिवा ते मुलुंड स्थानकापर्यंत अप जलद मार्गावर चालवल्या जातील.
    मध्य रेल्वेवर स. 8 ते सायं. 7 पर्यंत लोकल सेवा सुमारे 10 मिनिटे उशिरा धावतील. या कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील.


हार्बर रेल्वे

  • हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी-वांद्रेपर्यंत सकाळी 11.40 ते दुपारी 4.10 तर चुनाभट्टी-वांद्रे-सीएसएमटीपर्यंत स. 11.10 ते सायं. 4.40 पर्यंत मेगाब्लॉक असेल.

  • सीएसएमटी-वडाळा ते वाशी-बेलापूर-पनवेलपर्यंत स. 11.34 ते दु. 4.23 पर्यंत आणि सीएसएमटी ते वांद्रे-अंधेरी-गोरेगावपर्यंत स. 9.56 ते दु. 4.16 पर्यंत सेवा खंडित राहतील.

  • पनवेल-बेलापूर-वाशी ते सीएसएमटीपर्यंत स. 9.53 ते दु. 2.44 आणि गोरेगाव-अंधेरी-वांद्रेहून स. 10.45 ते सायं. 4.58 पर्यंत सेवा खंडित राहील. प्रवाशांच्या सुविधेसाठी पनवेल आणि कुर्लामार्गावर विशेष लोकल चालवण्यात येतील.


पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वेवर पालघर येथे नवीन पादचारी पुलासाठी गर्डर उभारण्यासाठी रविवारी, स. 10.15 ते दु. 1.00 पर्यंत दोन्ही मार्गांवर ब्लॉक चालणार आहे. त्यामुळे काही फेऱ्या रद्द केल्या जातील.