मुंबई: मेगा ब्लॉकनंतर खोळंबलेली हार्बर लाईनवरील वाहतूक आता पुन्हा सुरू झाली आहे. वडाळा-सीएसएमटी रेल्वे 40 मिनिटानंतर धावली असून आता दोन्ही बाजूने वाहतूक सुरू झाली आहे. पुढील वेळापत्रकानुसार हार्बरवरील गाड्या धावणार असल्याची स्टेशनवर रेल्वेच्या केंद्रीय प्रसारण विभागाकडून माहिती देण्यात आली आहे.
सीएसएमटी-पनवेल रेल्वे मार्ग देखील सुरु झाला आहे. इंडिकेटरवर पनवेल मार्गाकडे जाणाऱ्या गाडीचे वेळापत्रक दाखवण्यात येत आहे. हार्बरवर सीएसएमटी ते वडाळा स्टेशनवर दुपारी 2 ते 4 ब्लॉक होता. मात्र ब्लॉक होऊन तासभर वेळ झाला तरीही लोकल सुरू झाल्या नव्हत्या. त्यामुळे स्टेशनवर नागरिकांची गर्दी वाढायला सुरुवात झाली होती. आता दोन्ही बाजूने वाहतूक सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
सर्व मार्गावरील ट्रेन सुरू आहेत, मात्र सततच्या पडत असलेल्या पावसामुळे काही गाड्या या विलंबाने धावत असल्याची माहिती मध्ये रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.
आज सकाळी मशीद स्टेशनजवळ नागरी वस्तीच्या एका खाजगी भिंतीचा काही भाग ट्रॅक जवळ कोसळला. ही घटना सकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास झाली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी पडलेला तो भाग लगेच दूर केला आणि सकाळी 7.30 वाजल्यापासून हार्बर मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. त्या खाजगी भिंतीचा भाग सुरक्षित करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या संबधित अधिकाऱ्यांना सांगण्यात आले होते. वाहतूक सुरळित ठेवण्याच्या दृष्टीने हा भाग सुरक्षित करणे महत्वाचे असल्याने थोड्याच वेळात दोन तासांचा आपात्कालीन ब्लॉक घेण्यात येत असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. मध्य रेल्वेकडून मुंबई महापालिकेला सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येत आहे.
मुंबईत मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसाच्या परिणामी लोकल वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. हार्बर मार्गावर रेल्वे रुळांजवळ नागरी वस्ती आहे. काही ठिकाणी संरक्षक भिंतीही बांधण्यात आल्या आहेत. त्यापैकीच मशीद स्थानकाजवळील भिंतीचा एक भाग सकाळी कोसळला.