Bhagwan Rampure On Majha Katta : मुंबई शेअर बाजाराच्या समोर असलेल्या बिग बुलचे शिल्प तयार केलं, पण त्यानंतर महिनाभर मार्केट कोसळत होतं, पण महिन्याभराने मार्केट सावरलं, त्यानंतर टीकाकारांची तोंडं बंद झाली अशी आठवण प्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुरे यांनी सांगितली. भगवान रामपुरे (Bhagwan Rampure) यांनी आज एबीपी माझाच्या माझा कट्टा (Majha Katta) या कार्यक्रमात उपस्थिती लावली. 


बुल उधळलं आणि मार्केट पडलं


भगवान रामपुरेंना घडवलेल्या शिल्पांचे आज जगभर कौतुक केलं जातंय. त्यापैकीच एक शिल्प म्हणजे मुंबई शेअर बाजारासमोरच्या बिग बुल. या पुतळ्यारून त्यावेळी अनेक घडामोडी घडल्याचं सांगत भगवान रामपुरे म्हणाले की, बिग बुलचा तो पुतळा उभा केला, पण त्यानंतर शेअर बाजारात घसरण सुरू झाली. एक महिनाभर शेअर बाजारामध्ये घसरण झाली. त्यावेळी हा बिग बुल म्हणजे पणवती असल्याचं अनेकजण म्हणू लागले. बिग बुल आणि पणवती असा लेखही त्यावेळी टाईम्स ऑफ इंडियामध्ये छापून आला होता.


स्टॉक एक्सचेंजच्या बिग बुलवरून त्यावर आपल्यावर मोठी टीका झाली असं भगवान रामपुरे यांनी सांगितलं. ते म्हणाले की, बुल उधळलं आणि मार्केट पडलं अशी टीका सुरू झाली. पण एका महिन्यानंतर शेअर बाजार सावरला. नंतर त्यामध्ये वाढ व्हायला लागली. शेअर बाजार पडणे ही एक फेज होती, त्याचवेळी ते शिल्प लावण्यात आलं होतं हा योगायोग होता. शिल्पाचा आणि बाजार घसरण्याचा संबंध लावणे म्हणजे अंधश्रद्धा होती. 


बिग बुल शिल्पाची दिशा बदलायला सांगितली


भगवान रामपुरे म्हणाले की, शेअर बाजार वधारला तरीही त्या शिल्पाबद्दल अनेकांच्या मनात अंधश्रद्धा कायम होती. त्यामुळे अनेकांनी आपल्याला त्या बिग बुलची दिशा बदलायला सांगितली. त्या बुलमध्ये फोर्स जास्त आहे, तो कमी करता येईल का याचीही विचारणा करण्यात आली. त्या बिग बुलने डोळे वटारले आहेत, त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी बाहेर पडतेय असं अनेकांचं म्हणणं होतं. त्यामुळे डोळ्यामधील फोर्स कमी करता येईल का असंही अनेकजणांनी विचारलं. 


पण शेअर बाजार त्यानंतर सातत्याने वधारला, त्यामुळे बिग बुलबद्दल होणाऱ्या त्या सर्व चर्चा या अंधश्रद्धा असल्याचं स्पष्ट झालं असं भगवान रामपुरे यांनी सांगितलं. 


ही बातमी वाचा: