मुंबई : मुंबईत मंगळवारी झालेल्या पावसामुळे लोकल रेल्वेवर परिणाम झाल्याचं चित्र आहे. पश्चिम रेल्वेवर मंगळवारी रात्री 10 वाजून 56 मिनिटांनी सुटलेली लोकल बुधवारी पहाटे पाच वाजता विरारला पोहचली. म्हणजेच विरार गाठायला लोकलला तब्बल चार तासांचा विलंब झाला.


एम-इंडिकेटरनुसार चर्चगेटला सुटणारी 10.56 ची विरार फास्ट लोकल रात्री 12 वाजून 25 मिनिटांनी विरारला पोहचते. अंधेरीपर्यंत जलद असणारी ही लोकल जोगेश्वरीपासून धीम्या मार्गावरुन धावते. साधारण दोन तासांचा हा प्रवास करायला लोकलला मंगळवारी मात्र सहा तास लागले.

अख्खी रात्र ट्रेनमध्ये काढावी लागल्यामुळे विरार लोकलमधील प्रवाशांचे हाल झाले. काही जणांनी जवळच्या स्टेशनवर उतरुन पर्यायी मार्गाने जाणं पसंत केलं, तर काही जण ट्रेनमध्येच बसून राहिले.

पश्चिम रेल्वेवर विरार, चर्चगेटहून सुटणाऱ्या गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावत आहेत. तर मध्य रेल्वेची वाहतूकही 15 ते 20 मिनिटं उशिराने आहे. हार्बर आणि ट्रान्सहार्बरवरील लोकल वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुंबईतील लोकलच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पाणी साचल्यामुळे लोकलसोबतच रस्ते वाहतुकीवरही परिणाम जाणवत आहे. मुंबई शहर-उपनगरासह ठाणे, कल्याण आणि वसई-विरार परिसरात पावसाची संततधार सुरुच आहे. अनेक ठिकाणी रात्रीपासून वीजपुरवठाही खंडित करण्यात आला आहे.