मुंबई : लोकल अपघातासाठी नियुक्त झालेल्या खासदार समितीचा अहवाल बासनात गुंडाळून ठेवलाय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचं कारण म्हणजे मुंबईत लोकल प्रवासात शनिवारी एकाच दिवशी 15 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलाय, तसंच गुरुवारी 14 जणांचा मृत्यू झाला होता.


 
आठवड्याभरात मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर एकूण 66 प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाल्याची तर 56 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या सहा महिन्यातील 'लोकलबळीं'चा एकूण आकडा 1473 असल्याची नोंद आहे. म्हणजेच सरासरी प्रत्येक दिवशी नऊ प्रवाशांचा मृत्यू ओढावला आहे.

 
डोंबिवलीतील भावेश नकाते या तरुणाचा प्रचंड गर्दी असलेल्या गाडीत शिरण्याच्या प्रयत्नात हात सुटून धावत्या गाडीतून खाली पडून मृत्यू झाला होता. या घटनेची गंभीर दखल घेत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील अपघात रोखण्यासाठी वेगवेगळ्या समितींची स्थापना केली.

 
रेल्वेच्या उपाययोजनांसोबतच प्रवाशांनीही आपल्या परीने काही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. धावती लोकल पकडण्याचे साहस करणे, ट्रेनच्या दरवाजात लटकणे किंवा स्टंटबाजी करणे, रुळ ओलांडणे, लोकलच्या टपावरुन प्रवास करणे, अशा गोष्टी प्रवाशांनीही टाळल्यास स्वतःचाच जीव धोक्यात जाणार नाही.