मुंबई : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्यावर काँग्रेसनं आणखी एका नव्या आरोपाची तोफ डागली आहे. वायकरांशी संबंधित असलेल्या कंपनीला जोगेश्वरी गुंफा परिसरात एसआरएचं कंत्राट मिळून देण्यासाठी वायकरांनी मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा आरोप होतो आहे.


 

जोगेश्वऱीच्या गुंफा राष्ट्रीय स्मारक परिक्षेत्रात मोडत असल्यामुळं लगतचा परिसर नो डेव्हलपमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. मात्र, असं असतानाही, या परिसरात ऐश्वर्या अवंत बिल्डरला एसआरएस प्रकल्पाची मंजुरी मिळवून देण्यासाठी वायकरांनी मदत केल्याचा आरोप संजय निरुपमांनी केला आहे.

 

रवींद्र वायकर हे ऐश्वर्या अवंत बिल्डरचे भागीदार होते, अशी माहिती देखील समोर येते आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसनं रवींद्र वायकरांवर घोटाळ्यांच्या आरोपांची मालिकाच सुरू केली आहे. याआधी काँग्रेसनं वायकरांवर आरे कॉलनीतील जागा हडपून जिम उभारल्याचा आरोपही केला आहे.

 

वायकरांचं स्पष्टीकरण

 

कुठलाही सबळ पुरावा हाती नसताना,गेल्या दोन दिवसांपासून संजय निरुपम हे माझ्यावर अपुर्‍या माहितीच्या आधारे तसेच बिनबुडाचे आरोप करून ते आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन करीत असल्याचा आरोप गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर केला आहे.