मुंबई :  मुंबईतील गोराई चारकोपमधून (Mumbai Charkop)  एक धक्कादायक बातमी आली आहे. गोराई चारकोपमध्ये रहिवाशी इमारतीतील चौथ्या मजल्यावरुन लिफ्ट वेगात खाली आदळल्यानं (Mumbai Lift Accident) एका 62 वर्षीय वृध्द महिलेचा मृत्यू झाला आहे.  नगीना अशोक मिश्रा असं या मृत महिलेचं नाव आहे. गोराई चारकोपमधील हायलँड ब्रिज इमारतीत घडली आहे. या घटनेमुळे लिफ्टमुळे होणाऱ्या अपघातांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहेय 


 सुरुवातीला विजेचा शॉक लागल्यानं नगीना मिश्रा यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. पण आता यात नवी माहिती समोर आल्यानुसार नगीना मिश्रा यांचा मृत्यू हा लिफ्ट वेगानं खाली आदळल्यानं झाला आहे. 21  ऑक्टोबर रोजी ही घटना घडल आहेय 


चारकोप परिसरातील हायलँड ब्रिज या इमारतीत चौथ्या मजल्यावर राहणारी 62 वर्षीय महिला 21 ऑक्टोबरला सकाळी 6 वाजता मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी लिफ्टने खाली जात होत्या. लिफ्ट अचानक तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या मध्यभागी अडकली. यामुळे घाबरून महिलेने आपल्या मुलाला आवाज दिला. त्यानंतर मुलगा पळत पळत आला व त्याने लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्नही केला. मात्र त्याला लिफ्टचा दरवाजा उघडला गेला नाही. म्हणून इमारतीच्या गेटवरील सिक्युरिटी गार्डला सोबत घेऊन लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला परंतु दरवाजा उघडला नाही. लिफ्ट अति वेगाने तळमजल्यावर जाऊन आदळली. लिफ्ट आदळल्यामुळे तळ भागाला दोन मोठे  छिद्र पडले. या दुर्घटनेत त्या वृद्ध महिलेला गंभीर दुखापत झाली. यानंतर जखमी अवस्थेत महिलेला सोसायटीतील रहिवाशांनी एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्या महिलेला मृत घोषित केले. चारकोप पोलीस गुन्हा दाखल करून या घटनेच्या संदर्भात अधिक तपास करत आहे.  लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाला की, यात कुणाचा निष्काळजीपणा याबबत चौकशी होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळं पुन्हा इमरतीतील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.


शाळेच्या लिफ्टमध्ये अडकून शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू


एका वर्गातील तास संपवल्यानंतर दुसऱ्या वर्गात जाण्यासाठी निघालेल्या शिक्षिकेचा शाळेतील लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. मालाड (Malad) पश्चिमेत चिंचोली पाठक (Chincholi Bunder) जवळ असलेला सेंट मेरी इंग्लिश स्कूलमध्ये (St Mary’s English High School) घटना घडली होती.  दरम्यान, जेनेली फर्नांडिस दुपारी दोन वाजताच्या सुमारास एका वर्गातील तास संपवल्यानंतर दुसऱ्या वर्गात जाण्यासाठी निघाल्या. मात्र, तांत्रिक बिघाडामुळं दरवाजा बंद होण्याआधीच लिफ्ट वरच्या दिशेनं जाऊ लागली. लिफ्टमध्यं अडकल्यानं जेनेली या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर फर्नांडिस यांना तात्काळ नजीकच्या लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आलं होते.