मुंबई : आम्हाला आंदोलन करु द्या, अन्यथा मंत्रालयात घुसू, असा इशारा प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू आणि आंदोलकांनी दिला आहे. मुंबईत मनोरा आमदार निवासासमोर बच्चू कडू आणि त्यांचे समर्थक दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करणार आहेत. मनोरा आमदार निवासाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


दिव्यांगांना देण्यात येणारी पेन्शन, व्यवसायासाठी दुकान, विनाअट घरकूल, संजय गांधी योजनेअंतर्गत मानधन वाढवणं, दिव्यांगांची कर्जमाफी करणं, स्पर्धा परीक्षेच्या वयोमर्यादेत वाढ, या मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात येतं आहे.

मात्र त्याआधीच पोलिसांनी समर्थकांना रोखल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. आज पोलीस आम्हला अडवत आहेत, म्हणून आम्ही इथे गांधीगिरीने आंदोलन करत आहोत, नाहीतर आम्ही मंत्रालयात घुसू, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.