मुंबई : हरियाणात महिलेचा पाठलाग केल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतही दोन महिलांच्या कारचा घरापर्यंत पाठलाग केल्याची घटना समोर आली आहे. महिलेने फेसबुकवर आरोपीचे फोटो पोस्ट करत पोलिसात तक्रार केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.


फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या आदिती नागपॉल बहिण आणि दोन लहान मुलांसोबत लोखंडवालातील घरी जात होत्या. सात ऑगस्ट म्हणजे रक्षाबंधनाच्या रात्री दोन वाजताच्या सुमारास पांढऱ्या कारमधील एका व्यक्तीनं अदिती यांच्या कारचा पाठलाग सुरु केला. अदिती त्यांच्या घरी पोहचेपर्यंत पाठलाग सुरुच होता.

घराजवळ येताच अदिती यांनी अखेर त्याला फटकारलं, तरी तो अदिती यांच्या इमारतीखाली उभा राहिला. अदिती यांनी मोठ्या हिमतीनं आरोपीचे फोटो काढले आणि इमातीच्या सुरक्षा रक्षकाच्या मदतीनं पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर आरोपी पसार झाला.

अदिती यांनी फेसबुकवर त्याचे फोटो पोस्ट करत त्याला पकडण्यास मदत करण्याचं आवाहन केलं. अदिती यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली.


36 वर्षीय आरोपी नितीश गोविंद शर्माला पोलिसांनी अटक केली आहे. व्यवसायाने तो सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. नितीशचा हेतू काय होता, घटनेच्या वेळी त्याने मद्यपान केलं होतं का, याचा तपास पोलिस करत आहेत.