मुंबई : लग्नघटिका समीप येताच वधू आणि वराच्या पोटात फुलपाखरं नाचायला लागतात, हे अलंकारिक वाक्य वाचायला चांगलं वाटतं. मुंबईतील 36 वर्षीय श्रीकांतच्या हृदयाचे ठोकेही वाढले होते, मात्र बोहल्यावर चढण्यासाठी अवघ्या पाच तासांचा कालावधी उरला असतानाच वधूने पोबारा केला. 'मिड-डे' वर्तमानपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.
श्रीकांत जवळपास दहा वर्ष आयुष्याच्या जोडीदाराचा शोध घेत होता. अखेर बेळगावातल्या अथनी या मूळगावी श्रीकांतची गाठ पूजा भंडारेशी पडली. पूजाला बघून हरखून गेलेल्या श्रीकांत आयुष्यभराची पुंजी लग्नात गुंतवली. मात्र जिच्यात गुंतवला, तिच्यामुळेच श्रीकांतला दोन लाखांचा हादरा बसला आहे.
श्रीकांत मुंबईतील काळाचौकी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली असून तिच्या कुटुंबीयांकडे 2 लाख रुपयांची भरपाई मागितली आहे.
परेलमध्ये राहणारा श्रीकांत चर्चगेटमध्ये नोकरी करतो. मार्चमध्ये गावी मामाकडे गेला असताना सायनला राहणाऱ्या पूजा भंडारेशी त्याची गाठ घालून देण्यात आली. पसंती जुळल्या आणि 27 मार्चला त्यांचा साखरपुडा झाला. 3 जुलै रोजी लग्नाचा मुहूर्त ठरला.
लग्नासाठी 35 हजारांचे कपडे खरेदी करण्यात आले होते. पत्रिका छापल्या गेल्या. परेलमधील भावसार ऑडिटोरिअममध्ये विवाह सोहळा रंगणार होता. मंडपापासून डीजेपर्य़ंत सगळं पार पडलं. 2 तारखेला हळद लागली. लग्नाच्या दिवशी सकाळी 9.30 वाजता पूजाच्या काकांचा फोन आला. पूजा कुठेतरी बेपत्ता झाली आहे, शोधाशोध करुनही ती सापडत नाही, असं तिच्या काकांनी सांगितल्याचं श्रीकांत म्हणाला.
'ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या काकांनी सायन पोलिसात मिसिंगची तक्रार दाखल केली. माझ्यावर लग्नासाठी आखलेल्या सगळ्या गोष्टी कॅन्सल करण्याची नाचक्की माझ्यावर ओढवली.' असं श्रीकांतने दुःखी चेहऱ्याने सांगितल्याचं 'मिड-डे'ने म्हटलं आहे. मी तुला पसंत आहे ना, असं तिला वारंवार विचारायचो, असंही श्रीकांत म्हणाला. संध्याकाळी त्याने काळाचौकी पोलिसांत फसवणूक आणि विश्वासघाताची तक्रार दाखल केली.
धक्कादायक बाब म्हणजे मंगळवारी सकाळी पूजा सायन पोलिसात गेली. श्रीकांतशी लग्न करण्याची आपली इच्छा नसून माझं एका मुलावर प्रेम आहे, असं तिने सांगितलं. 'माझ्या नातीचं वर्तन पाहून मी खूप नाराज आहे. तिचे आई-वडील गेल्यावर मीच तिचा सांभाळ केला. तिला तो मुलगा आवडला नव्हता, तर मला आधीच सांगायचं होतं. अख्ख्या कुटुंबाला तिने लाज आणली. आम्ही लाखभर रुपये लग्नावर खर्च केले. आता कुठून आणणार हा पैसा?' असा प्रश्न पूजाच्या आजीने 'मिड-डे'शी बोलताना उपस्थित केला.