उत्तर प्रदेशातील गाझियाबादहून आलेल्या 30 वर्षीय तरुणीने सोमवारी 'ओला'च्या अॅपवरुन शेअर टॅक्सी बुक केली. मुलाखतीसाठी ती अंधेरीहून परेलला जात होती. टॅक्सीत बसताना सहप्रवासी होते, मात्र आपण शिवाजी पार्क परिसरात पोहचलो त्यावेळी टॅक्सीत एकटीच असल्याचं तक्रारदार तरुणीने सांगितलं.
'मी फोनवर बोलत होते. त्याचवेळी चालकाने टॅक्सी थांबवल्याचं माझ्या लक्षात आलं. मी ड्रायव्हरकडे पाहिलं, त्यावेळी त्याने पँटची झिप उघडून अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली' असा आरोपी तरुणीने केला आहे. घाबरल्यामुळे आपण टॅक्सीबाहेर पळ काढला आणि शक्य तितकं लांब गेलो. पादचाऱ्यांना जवळच्या पोलिस स्थानकाचा पत्ता विचारुन शिवाजी पार्क पोलिस स्टेशन गाठल्याचं तिने सांगितलं.
ओला अॅपवरील नोंदणीकृत क्रमांक आणि मोबाईल नंबरवरुन ड्रायव्हरची ओळख पटली आहे. लवकरच आरोपीला बेड्या ठोकू, असं पोलिसांनी सांगितलं. ओला चालकाकडून महिलेचा विनयभंग होण्याची ही पहिलीच वेळ नाही. मे महिन्यात बंगळुरुतील ओला चालकाविरोधातही विनयभंगाचा आरोप झाला होता.