मुंबई : मुंबईतील बेपत्ता तरुणी कीर्ती व्यासची हत्या झाल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. कीर्तीच्या हत्येप्रकरणी तिच्या दोन सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. मेमो दिल्याच्या रागातून दोघांनी कीर्तीचा जीव घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे.


28 वर्षीय कीर्ती व्यास बीब्लंट सॅलॉनच्या अंधेरी पश्चिम भागातील शाखेत फायनान्स मॅनेजर म्हणून नोकरी करत होती. कीर्ती गेल्या दीड महिन्यांपासून बेपत्ता होती.

क्राईम ब्रांचने कीर्तीच्या दोन सहकाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. कीर्तीचा मृतदेह अद्याप सापडला नसला, तरी दोघांनी तिची हत्या केल्याची कबुली दिली आहे. आरोपींच्या गाडीत  रक्ताचे सुकलेले डागही आढळले होते. कीर्तीच्या पालकांची डीएनए टेस्ट केल्यानंतर ते रक्त कीर्तीचं असल्याचं समोर आलं आहे.

ढिसाळ कामाबद्दल कीर्तीने आरोपीला मेमो दिला होता. या रागातून सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी सजवानी या दोघांनी कीर्तीचा जीव घेतल्याचा संशय आहे. मात्र हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
दीड महिन्यापासून बेपत्ता मुंबईकर तरुणीची हत्या?

कीर्ती ग्रँट रोडमधील भारत नगर परिसरात राहत होती. ती 16 मार्चला सकाळी घराबाहेर पडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कीर्ती 8 वाजून 50 मिनिटांनी बिल्डिंगबाहेर पडताना दिसते. त्यानंतर सिद्धेश आणि खुशी यांनी तिला लिफ्ट दिली होती. कीर्तीला ग्रँट रोड स्टेशनजवळ असलेल्या नवजीवन सोसायटीजवळ सोडल्याचा दावा दोघांनी सुरुवातीला केला होता.

कीर्तीच्या आईने सकाळी 11 वाजताच्या सुमारास तिला फोन केला होता, मात्र संपर्क होऊ शकला नव्हता. रात्रीपर्यंत कीर्ती घरी न आल्यामुळे तिच्या पालकांनी डी बी मार्ग पोलिसात तक्रार दाखल केली होती.

नवजीवन सोसायटीजवळच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कीर्ती गाडीतून उतरलेली दिसत नव्हती. तेव्हापासून कीर्तीचा ठावठिकाणा लागत नव्हता. तिचा फोनही स्वीच्ड ऑफ होता. शिवाय गेल्या सहा वर्षांत कधीच कुठला सहकारी कीर्तीला पिक अप करण्यासाठी न आल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला होता.

कीर्ती काम करत असेललं बीब्लंट सॅलॉन अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तरची घटस्फोटित पत्नी अधुनाच्या मालकीचं आहे. कीर्ती बेपत्ता झाल्यानंतर फरहाननेही कीर्तीला शोधण्यासाठी ट्विटरवरुन आवाहन केलं होतं.